Pages

Thursday, November 26, 2009

हॉस्टेल हॉस्टेल - दुसरी ती रूम !

हॉस्टेल हॉस्टेल - दुसरी ती रूम !

हॉस्टेलमध्ये जाऊन रूम न बघणे म्हणजे आग्र्यात जाऊन ताजमहाल न पहाण्यासारखं झालं. रूममध्ये प्रवेश केल्या केल्या दरवळणारा तो न धुतलेल्या सॉक्सचा सुगंध, दाराच्या डाव्या बाजूसच जुन्या काळ्या गोल सॉकेटमध्ये अडकवलेल्या पाणी तापवायच्या "रॉड"च्या तारा, प्रत्येक फेरित "कटर..कुटकुट..कुटकुट.." असा काहितरी आवाज काढणारा पंखा, तुटलेल्या हॅंडलची भली मोठी बादली, त्यात एका प्लॅस्टीकच्या "मग्ग्यात" (तांब्यात) कोंबून भरलेले साबण, G T (Glass Tressing) मारण्यासाठी खिडकीतून वजा झालेला काचेचा तुकडा, आरसा, कंगवा, दाढीचं सामान यांसारख्या गोष्टी ठेवण्यासाठी वापरलेलं प्रत्येक पुस्तक, भिंतीवरची भोकं लपवण्यासाठी लावलेली हिरॉइनची पोस्टर्स, एकाच दोरीवर लटकवलेले कमीत कमी पंचवीस कपडे, उरलेले सगळे कपडे सांभाळणारी तुटकी लाकडी खुर्ची, आजूबाजूच्या रूममधले, नुकतेच मेसमध्ये काय असेल ते ओरपून आलेले, जागा मिळेल तिथे घोरत पडलेले, ४-५ उघडेबंब कुंभकर्ण, कान फुटतील अशा "नॉर्मल" आवाजात लावलेली गाणी आणि या सगळ्यात चष्मा लावून अभ्यासाचं पुस्तक ऊघडून बसलेला त्या रूममधलाच कोणीतरी एक बिचारा, जर तुम्ही कधी पाहिला नसेल तर खरच कधी, कोणा हॉस्टेलला जा.

Friday, November 20, 2009

हॉस्टेल हॉस्टेल - पहिला मान ढेकणाचा !

हॉस्टेल हॉस्टेल - पहिला मान ढेकणाचा !

पृथ्वीवर जीवनाच्या उत्पत्तीचे सगळे सिद्धांत साफ खोटे आहेत. जीवनाची सुरूवात ही ढेकणांपासूनच झाली याची मला आणि माझ्यासारख्या हॉस्टेलाइट्सना पूर्ण खात्री आहे. ढेकूण आणि झुरळ हे प्राणी पृथ्वीच्या जन्मापासुनच सुखाने नांदत आलेत आणि पुढेही रहातील. अशा या सुखी संसारांमध्ये पाहुणे म्हणून मी आणि माझे पार्टनर, 1st year ला, हॉस्टेलच्या रूमवर रहायला गेलो.