Pages

Monday, February 08, 2010

सडाफटिंग निशाचरांची रत्नागिरी स्वारी

"बरेच दिवस झाले..साला आपण काही केलं नाही..." रानडे परत पेटले होते... "बाईक घेऊन घरी जायचं??" गोगट्यांनी पिल्लू सोडलं....
"Great, how about night riding??"... रानडे म्हणाले.... "अरे आजच्या मॅचचं काय झालं रे..?" गोगट्यांनी विषय बदलला... पण रानड्यांच्या डोक्यात किडा वळवळला होता. लगेच त्यानी आमच्या ग्रुपमधले एकमेव आर्टीस्ट सोहोनी (अमेय), डोक्याने ऊत्तम पण ज्यांच्या सगळ्या गोष्टींत नेहमी गाढव शिंकते असे भिडे (राजेश), आपले भलेमोठे मोने आणि मला फोन फिरवला. आता आर्टीस्ट म्हटल्यावर.. डोक्याने तितकेच सणकी असलेले सोहोनी एका पायावर तयार झाले.. तशा सोहोन्यांनी मुंबई-रत्नागिरी अशा ७-८ बाईक ट्रिपा आधीच मारल्या होत्या. भिडे काय होय म्हणणारच होते...त्याने कधी कुठल्याच गोष्टीला नाही म्हटल्याचे मला आठवत नाही... तर, राहिले द्विधाधारी गोगटे, वजनदार मोने आणि "बिचारा" मी.