Pages

Tuesday, January 30, 2018

बेरा, बिबट्या आणि मी

गेली अडीच वर्षं ऐकतेय मी, 'बिबट्या नाही बघितला, बिबट्या नाही बघितला', काही विचारू नका! शेवटी असंच एक दिवस बाबा ऑफिसातून आला आणि मला ऊचलून नाचत नाचत म्हणाला "बिबट्या बघायला आपण 'राजसथान' (का असंच कुठेतरी) जायचंय!!" मला फिरायला खूप आवडंत. आईपण जरा जास्तच खूष वाटत होती. गुरुवारी सकाळी आम्ही पुण्याहून पार्ल्याला शुभाआजीकडे आणि मग तिथून 'बेरा' ला जाणार होतो. त्यामुळे बुधवारी आई आणि बाबा ब्यागा (बॅगा) भरत होते. तिकडे खूप थंडी असेल म्हणून एक घट्ट पिंक-गुलाबी जॅकेट आईने ब्यागेत कोंबले.


मी आणि पिंक-गुलाबी जॅकेट 

ब्याग भरायला मी आईला मदत करत होते. मला गाड्या खूप खूप आवडतात, त्यामुळे मी माझ्या सगळ्या गाड्या आईच्या ब्यागेत ठेवल्या. सगळ्या गाड्या ठेवायला हव्यात म्हणून ब्यागेतले थोडे सामान बाहेर काढले. यावरून आई मला का ओरडली ते कळलंच नाही. मग मी रडायला लागले. रडले नाही तरंच शुभा आजीकडे जायला मिळेल असे बाबा म्हणाला, म्हणून मी रडायचे थांबले. त्यानंतर मला बोर्न्विटाची भूक लागली आणि परत रडायला लागले. मग बोर्न्विटा पिऊन मी मिनिअनची गोष्ट ऐकू लागले.
सुर्यबाप्पा आल्यावर मी ऊठले. आम्हाला न्यायला 'आमून गाडी' (मारुती स्विफ्ट डिझायर) येणार होती. मला दात घासायला अजिबात आवडत नाही आणि आई बाबा माझे काही ऐकत नाहीत. दात घासून आमून गाडीमध्ये बसून आम्ही निघालो. त्या गाडीत मागे छोटा टिव्हि होता. त्यात मी गाणी बघितली. आमच्या बरोबर 'मोनुकाका' पण येणार होता. मोनुकाकाने मला डंपर, क्रेन आणि पोलो जिटी दिली आणि तो माझ्याशी गप्पा मारतो म्हणून मला तो आवडतो. मोनुकाका माझ्या बाबापेक्षाही 'मोठ्ठा' आहे. मोनूकाका पण माझ्या सारखाच पहिल्यांदा जंगलात जाणार होता. मोनुकाका गाडीत बसल्यावर मी त्याच्याशी काही बोलले नाही. तसं आई, बाबा, दोन्ही आजी आजोबा सोडून समोर कोणीही आलं तर मी दहा मिनिटं बोलत नाही. आमून गाडी जोरात चालली होती. मग गाडी गोल गोल वेड्या वाकड्या घसरगुंडीवरून खाली आल्यावर बाबा "दत्तला थांबवा" असं काहितरी ड्रायवर काकाना म्हणाला. तिथे एक कणसाची बसही (शिवनेरी व्होल्वो) होती. मी पण खूप कणिसं खाल्ली. मग मी बाबाला 'सोनेरी बेबीचे' गाणे लावायला सांगितलं "हे कुठलं गाणं?" बाबा म्हणाला. मग मी आईला सांगितलं "ते सोनेरी बेबीचं गाणं लाव ना". आईलाही कळेना. "अगं ते बाबा नेहमी पोलो जिटी मधे लावतो ते" मी आईला रागावले. आई एकदम जोर जोरात हसत बाबाला म्हणाली "'बेबी डॉल मै सोनेदी' गाणं ऐकायचं आहे हीला." मग आई, बाबा, मोनूकाका आणि ड्रायव्हरकाका जोरा जोरात हसायला लागले. मला कधीकधी कळंत नाही ही मोठी माणसं ऊगाच का हसत असतात ते.
पुढे डोळे उघडले तेव्हा मी शुभाआजीच्या घरी होते. मी तिच्याबरोबर खूप खेळले.
रात्र झाली आणि आम्ही पुन्हा एकदा आमून गाडीत बसून रेलवे स्टेशनला पोहोचलो. शुभा आजी आमच्याबरोबर आली नाही म्हणून मी थोडी रडले, पण आईने मला ट्रेन दाखवल्यावर मी रडायचं  विसरले. आमच्याबरोबर पराग काका पण होता. तो मोनूकाकापेक्षाही 'मोठ्ठा' आहे. तिथे पोहोचल्यावर अजुन एक काका भेटणार होता. बाबा, सारखा "त्याला 'सहस्र्बुध्धे काका' म्हणायचं हं" (सहस्त्रबुद्धे काका) असं सांगत होता. त्यानंतर अजुन एक काका आला. त्याचं नाव विराज काका. असे सगळे मिळून आम्ही, अम्म्म्म एक, दोन, तीन, चार, सहा, आठ, सात, दहा (खरे सात) जण होतो. मला दहा आकडे येतात. त्यानंतर रेल्वेच्या रुळापर्यंत जाताना फक्त 'सहस्रबुध्धे काका' एकटाच बोलत होता. बाकी सगळे नुसते फिदी फिदी हसत होते. का हसत होते काय माहीत? मी मात्र झुकझुक गाड्या बघत होते. मला झोपायची ट्रेन कशी असते ते बघायचं होतं. कूssssss झुक, झुक करत आमची टी-फॉर-ट्रेन आली. सगळे काका नवीन असल्याने मी अजुनही कोणाशी बोलले नव्हते. झोपायची ट्रेन मस्तच होती. बाहेर चांदोबा छान हसत होता. विराज काकाने गाजराचा हलवा आणला होता. त्यातले काजू आणि बेदाणे मीच खाऊन टाकले. सगळ्या काकांनी खूप खूप खाऊ आणला होता. मी सगळा फस्त केला आणि मग झोपाळ्यासारख्या झुलणार्‍या त्या गाडीत मी शहाण्या मुलीसारखी झोपले.

सकाळी मी उठले तेव्हा झुक झुक गाडी जोरात पळतच होती. बाहेर लांब छोटे छोटे झाडं नसलेले दगडांचे डोंगर दिसू लागले. मोठी झाडं गायब झाली आणि माती वेगळी दिसू लागली.


सपाट 

नंतर ती एके ठिकाणी थांबली. "अबूची रबडी (आबू रोड स्टेशन वरची रबडी) सॉलिड असते." असं म्हणत सहस्र्बुध्धे काका आणि पराग काका खाली ऊतरले आणि लगेचच खूप छान बासुंदी घेऊन आले. गाडी कूssssss करून परत सुरू झाली, सहस्र्बुध्धे काका पुन्हा बोलू लागला आणि बाकी सगळे फिदी फिदी हसायला लागले.

 

 अबूची रबडी
मी पुन्हा झोपून ऊठले तेव्हा आमची ट्रेन थांबली. बाबा मला घेऊन खाली चकचकीत रूळांवर उतरला. 'मोरी बेरा' नावाच्या स्टेशनवर आम्ही उतरलो.


सहस्र्बुध्धेकाका, परागकाका, विराजकाका, मोनूकाका, आई, मी आणि बाबा

बाहेर आल्यावर आम्हाला न्यायला आलेल्या दोन दोन जिप्सी दिसल्या. मला त्या जिप्सीमधे कधीपासून बसायचे होते. माझ्याकडे छोटी जिप्सी आहे. पण त्यात बसता येत नाही. जिप्सिला छत नव्हते आणि समोर काचही नव्हती. दुपारच्या उन्हात मस्त मस्त वारा होता. आईने मला गॉगलपण दिला घालायला. तिथे आमच्या घराजवळ जशी मोठी मोठी झाडं आहेत तशी दिसत नव्हती. मग मी गाणं म्हणू लागले "जीपची चाकं फिरतात गोल गोल गोल.." तिथला रस्तापण मजेशीर होता. "पिपल ऑन द जीप गो अप एन डाऊन" व्हायला लागलं. थोड्या वेळाने आम्ही एका मोठ्ठ्या महालासमोर पोहोचलो. तिथे छान झाडं होती, झाडावर खूप पोपट आणि खारुताई होत्या.पांढर्‍या शुभ्र "बेरा कॅसल"मध्ये आत शिरताना साडी नेसलेल्या दोन तीन तायांनी मला कुंकू लावले, ओवाळले आणि नंतर आई, बाबा आणि सगळ्या काकांना कुंकू लावले. याआधिही मी हॉटेल रूम मध्ये राहिले आहे. पण हा तर किल्लाच होता. प्रत्येक रूम म्हणजे महाल होता. इथे सगळंच मोठ्ठ होतं. बाबाचे डोळे फक्त बाहेर पडायचे बाकी होते. वेड्यासारखा इकडून तिकडे फिरत होता. या महालात जिकडे तिकडे छान छान चित्रे भिंतीवर टांगलेली होती. काही तिथल्या राण्यांची, बाकी प्राण्यांची. बिबट्यांची चित्रे तर मला खुपंच आवडली.बेरा महाल

"मै दोन दिन का ठाकूर आहे" असं काहीतरी म्हणत बाबा आमच्या त्या पॉश घरात शिरला आणि सोफ्यावर पसरला. सगळी आवरा आवरी झाल्यावर आम्ही जेवायला गेलो. जेवायची रूम तर इतकी सॉलिड होती की काही विचारू नका. जेवण एकदम मस्त होते. मी फक्त ज्युस, पापड आणि गुलाबजाम खाल्ले. आईने मला भात खायला लावला. सहस्र्बुध्धे काकाची बडबड आणि बाकिच्यांचे फिदी-फिदी चालुंच होतं.

 


 

मै दोन दिन का ठाकूर आहेमोठ्ठा मोनूकाका


त्याहून मोठ्ठा परागकाका


"चला आता पहिली सफारी!" बाबा भलताच खूष वाटत होता. दुपार होती, ऊन्हही पडले होते. पण हवा गार गार होती. आमच्या जिप्स्या समोरच उभ्या होत्या. जिप्सीतून फिरायंच, व्वा मला तर खुपच मज्जा वाटत होती.
 

जिप्सी आणि मी

 

बाबा भलताच खूष वाटत होता

बाबा आणि पराग काकाकडे मोठ्ठे कॅमेरे होते. आणि जिप्सी मध्ये दुर्बिणी होत्या. हा काय प्रकार असतो ते मला माहीत नव्हते पण सगळेजण डोळ्याला लावून बघत होते. आम्ही सगळे एका जिप्सीत बसून निघालो. ड्रायव्हरकाका एकदम जोरात गाडी चालवत होता. मला भरपूर वारा लागत होता. आमची जिप्सी एका मातीच्या रस्त्यावर वळली.


त्या मातीचा थोड्यावेळाने डोंगर झाला. डोंगरावर झाडं फार नव्हती पण दगड खूप होते. रस्ता तर दिसतच नव्हता. खूप मोठ्ठा चढ होता. "हा खरा फोर बाय फोर चा फायदा" असं काहीतरी बाबा म्हणाला. जिप्सी खूपच अप अॅन्ड डाऊन होत होती. मला खूप मज्जा येत होती. थोड्या वेळात आम्ही डोंगराच्या डोक्यावर चढलो आणि समोर बघतो ते काय खूप मोठ्ठा समुद्र (मोठा तलाव). समुद्राचे पाणी एकदम ब्लु ब्लु. मागे मोठे मोठे डोंगर. डोंगरांवर नुसते दगड. आमच्या माखजनच्या डोंगरांवर खूप झाडं आहेत पण हे डोंगर शेजारच्या आजोबांच्या डोक्यासारखे होते. व्वा, अशी जागा मी कधीच बघितली नव्हती."अरे ती बघ तिकडे. लेकच्या टोकाला." मोनूकाका डोळ्याला दुर्बिण लावून वेड्यासारखे हात हलवत ओरडला. मला तर काहीच दिसत नव्हते. तेव्हढ्यात मी एकदम ओरडलेच. काही कळेच ना. अचानक सगळं एकदम जवळ जवळ आलं. मी पाण्यात ऊभी होते आणि समोर एक मगर "आ" करून लोळत पडली होती. मगाशी खूप लांब असलेले पांढरे शुभ्र बगळे बाजुला उभे होते. मला थोडी भीतीपण वाटली. आणि मी पाण्यात आहे तर आई कुठे आहे? मी रडायला लागणार एव्हढ्यात सगळं होतं तसं झालं. "दिसली का मगर दुर्बिणीतून?" बाबाने डोळे मोठे मोठे करत हसत विचारले. तेव्हा मला कळले ती दुर्बिण हा काय प्रकार आहे तो. आणि माझ्याकडे बघून आई, बाबा आणि सगळे काका खूप हसायला लागले. ही मोठी माणसं म्हणजे...
"अरे बोक्यांनो डावीकडे बघा. दोन मगरी पसरल्यात" सहस्र्बुध्धे काका किंचाळला. मग परत दुर्बिणीने मी जाड्या जाड्या खडबडीत मगरीला हात लाऊन आले. त्यांना भरपूर चकचकीत दात होते. आणि आई म्हणाली की त्या रोज चार वेळा दात घासतात. त्या खूप मासे खातात पण आजुबाजूच्या बगळ्यांना खात नाहीत.मगरी

मगरी बघून आम्ही परत जिप्सीतून निघालो. मगरीच्या पाठीसारख्या खडबडीत रस्त्यावरून आम्ही पुढे जात होतो. आजुबाजूला छोटी छोटी काट्यांची झाडं होती. त्यातून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. तेव्हढ्यात समोर खूप म्हशी आल्या. त्यांची छोटी पिल्लंपण (रेडकं) होती. मला म्हशी आवडतात पण त्यांच्या पाठीवर बसायला मला आवडत नाही. थोड्या वेळानं आम्ही एका सरळ रस्यावर आलो. त्यावर खूप माती होती पण ड्रायव्हरकाका गाडी जोर जोरात पळवत होते."अरे तो बघ, तो बघ वरती" परागकाका ओरडला तेव्हा मला जाग आली. आमची जिप्सी एका छोट्या डोंगराच्या खाली उभी होती. "अरे तो बघा उजवीकडे वरती, टोकावर". परागकाका परत ओरडला. मला तर काहीच दिसत नव्हतं. एव्हाना थोडा काळोखही झाला होता. "ती बाई काय वेडी आहे का? वरती बिबट्या बसलाय आणि थोडं खाली ऊतारावर ही बकर्‍यांना घेऊन ऊभी आहे. आज काहीतरी बघायला मिळणार वाटतं. ती नाहीतर तिच्या बकर्‍या" बावळटासारखं हसत बाबा म्हणाला!
मला ना बिबट्या दिसत होता, ना ती बाई दिसत होती, ना तिच्या बेंss (बकर्‍या) दिसत होत्या. पण थोड्या वेळाने शेवटी मला बिबट्या दिसलाच. तो एका खूप मोठ्या दगडावर उड्या मारत होता. तेव्हढ्यात आईने दोन्ही हातात माझे डोके पकडून हळूच ऊजवीकडे फिरवले आणि वरती बोट दाखवत म्हणाली "अगं बाई, बिबट्या तिकडे आहे! तु बघतेयंस ते माकड आहे!"


मला दिसलेला बिबट्या (माकड)

एव्हढं करूनही "तो" काही मला दिसला नाही. बाबाने दुर्बिण लावली तरिही मला तो दिसला नाही. थोड्या वेळाने एक बाई आणि तिच्या खूप बेंss समोर आल्या. त्यांची छोटी छोटी पिल्लं इतकी गोड होती की काही विचारू नका. आणि बिबट्याने एकालाही खाल्लं नाही. "अरे वरती एक नाही दोन बिबळे आहेत" विराज काका म्हणाला. सगळे काका बिबट्याला बिबळ्या म्हणत होते म्हणून मी खूप हसले. "दोन नाही तीन आहेत" बाबा एकदम जोशात म्हणाला. "झाडी मध्ये चौथापण आहे." कोणतातरी काका म्हणाला. मिनिटाला एक अशा प्रमाणात बिबटे वाढत होते. मी पुन्हा एकदा तिकडे बघितले पण मला एकही दिसत नव्हता. मला बिबट्यापेक्षा बकर्‍या जास्त आवडतात. त्या बेंss बेंss करतात. "होय रे, चौथा पण दिसतोय. तिकडे ऊजव्या बाजुच्या झुडुपात." पराग काका फारच खूश वाटत होता.


बाकीच्यांना दिसलेले बिबटे

आता मात्र खुपच काळोख झाला होता. "बिबटे खाली उतरतायत" बाबा ओरडला. थोड्याच वेळात "समोरच्या झाडीत आहेत" असं आई एकदम हळू हळू आवाजात म्हणाली. मला खूप भुक लागली होती. त्यामुळे मी रडायला सुरुवात केली. पण सगळे काका, बाबा आणि आई मला एकदम "शूsss" असं म्हणाले त्यामुळे मी थांबले. "अजिबात आवाज करू नकोस नाहीतर बिबट्या तुला घेऊन जाईल" असं एकदम रात्री बोलतात तशा आवाजात आई म्हणाली आणि हातात बिस्किट दिलं. मग बाकी सगळे बिबट्या बघत होते आणि मी मस्त चॉकलेटचे बिस्किट खात होते. तिथे एकूण तीनच बिबटे होते, चौथा बिबट्या फक्त पराग काकाला दिसला म्हणून सगळे त्याला चिडवत होते आणि हसत होते.


मला पुन्हा (न) दिसलेला बिबट्या

"सायटिंग चांगले झाले पण पोट नाही भरले" असं काहीतरी बाबा पुटपुटला. परत हॉटेलवर जाताना आईला वटका-घूळ (वटवाघूळ) दिसले. "मला नाही दिसत आहे वटकाघूळ" असं म्हटल्यावर सगळे हसायला लागले. आणि ही मोठी माणसं मला सांगतात "ऊगाच हसणार्‍यांना वेडं म्हणतात"!! आता वटकाघूळाला वटकाघूळच म्हण्णार ना?

जाताना मला खूप थंडी वाजली. त्यामुळे आईने मला पुर्ण गुंडाळून ठेवले. जाता जाता आमच्या समोरून एक लांबच लांब पायांचा ऊंट जोरात धावत गेला. आणि त्या ऊंटाचे, टोपी घातलेले आजोबाही आम्हाला दिसले.
वाटेत मस्त गरम गरम 'मटका चहा' आणि बिस्किटं खाऊन आम्ही परत त्या महालात पोहोचलो.


थंडी, न दिसलेला बिबट्या आणि गुंडाळलेली मी :(

रात्री मस्त जेवणानंतर मी आणि आई रूमवर गेलो. मी लस्कुमणासारखी (लक्ष्मणासारखी) बेशुद्ध पडले. मग बाबाला मी द्रोणागिरी पर्वतावरून संजिवनी बुटी आणायला सांगितली, तर त्याने मारुतीसारखा अख्खा पर्वत आणला आणि मला औषध देऊन जिवंत केले. आईने मला खूप गोष्टी सांगितल्या, नंतर बाबाने 'मिनि' नावाच्या मिनिअनची गोष्ट सांगितली आणि घोरायला लागला.बेरा महाल

आई बाबांनी मला उठवले तेव्हा रात्रच होती. सुर्य अजुन आला नव्हता. थोड्याच वेळात आम्ही पुन्हा जिप्सी मध्ये होतो. "आज हायना बघायला जाऊ." परागकाका म्हणाला. थंडी खूप होती त्यामुळे आम्ही सगळे गुंडाळलेले होतो. जिप्सीचे ड्रायव्हरकाका नेहमीसारखे गाडी जोरात चालवत होते. वाटेत रस्त्यावर आम्हाला काही मोठे मोठे पंखे दिसले. "ही ओवनचक्की" (पवनचक्की) असं काहीतरी आई म्हणाली. जाता जाता ड्रायव्हरनकाकांनी गाडी एकदम थांबवली. एक हरीण जोरात उड्या मारत आमच्या समोरून निघून गेले. सुंदर होते ते. मला खूप आवडले. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला कोल्हाही दिसला. पण कोल्हा खूप लबाड असतो त्यामुळे मला तो आवडत नाही. कोल्ह्याला बघितल्यामुळे मी आईकडे द्राक्ष मागितली पण आईकडे ती नव्हती.


लबाड कोल्हा

पुढे पुन्हा आम्ही जिप्सितून मोठा डोंगर चढलो आणि मग ऊतरलो. माझ्यासारख्या बाबा आणि मोनूकाकाला गाड्या खूप आठवतात. जिप्सीतून डोंगरावरून जाताना ते दोघे हातात गुलाबजाम मिळाल्यासारखे खूष होते.


खरा फोर बाय फोर

थोड्यावेळाने सूर्य आला. सगळीकडे ऑरेंज ऑरेंज झाले. मला जरा बरे वाटले. आजुबाजुला काट्यांचीच झाडं होती. थोडेफार डोंगर होते. पण बाकी सगळीकडे फक्त थंडी दिसत होती. मग डाव्या बाजूने एक "निळी गाय" (नीलगाय) आली. ती गाईसारखी दिसत नव्हती पण आकाराने तेव्हढीच होती. आम्हाला बघून ती पळून गेली."अरे मागे बघा, तिकडे हायना आहे." परागकाका एकटाच आमच्या मागे ऊभा होता. आम्ही तिकडे बघायच्या आत ते तरस गायब झाले. "रेकॉर्ड शॉट मिळाला" असं काहितरी तो म्हणाला. पुन्हा ते तरस काही दिसले नाही.


तरस, परागकाकाचा रेकॉर्ड शॉट

ड्रायव्हरकाका फोनवर काहीतरी हिंदीत बोलत होते. मला पण हिंदी येते "आपका नाम काय आहे?" असे. त्या काकांनी जिप्सी परत चालू केली. "काल दिसलेले तीन बिबटे परत त्याच डोंगरावर दिसत आहेत" बाबा म्हणाला. डोळे उघडले तेव्हा मला खूप तहान लागली होती. सगळी मोठी मंडळी त्याच डोंगरावर बिबट्या शोधत होती. मग मी ठेपले खाल्ले, पाणी प्यायले आणि बिबट्या शोधू लागले. "तो बघ तो बघ वरती. दगडावर बसलाय. दुर्बिण डोळ्याला लावून मोनूकाका म्हणाला." मोनूकाका सोडून बराचवेळ तो कोणालाही दिसत नव्हता. "अरे दगडा.. त्या दगडाच्या पुढे एक झुडुप आहे तिथे आहे" मोनूकाका बाबाला रागावला. मग हळू हळू सगळ्यांना तो दिसला. बाबा आणि मला काही केल्या दिसेना. "अरे घोड्या.. लांब आहे पण समोरच आहे, दिसत कसा नाही?" आई बाबाला रागावली. मी हसायला लागले. मग बाबाने पुन्हा एकदा बघितले आणि लगेच त्याला बिबट्या दिसला. मला मात्र अजुनही तो दिसला नव्हता. एव्हढ्यात जिप्सीच्या बाजुलाच एक पोपट येऊन बसला. छान छान हिरवा ग्रीन होता. तो एका जागेवरून उडायचा आणि फेरी मारून परत तिथेच येऊन बसायचा. "अगं तो पोपट नाहिये, त्याला 'वेडा राघू' म्हणतात" बाबाला बिबट्या खरंच दिसला होता की नाही माहित नाही पण तो वेडा पोपट नक्कीच दिसला होता.


वेडा राघू

तेव्हढ्यात तो बिबट्या जागेवरून ऊठला आणि जरा दिसेल अशा ठिकाणी येऊन बसला. बाबाने पटकन व्हिडिओ काढून घेतला.


दिसला एकदाचा

हॉटेलवर परत येताना बाबाने एका घारीचा फोटो काढला. "याला 'शिक्रा' म्हणतात." परागकाका म्हणाला. थंडी जरा कमी झाली होती. हॉटेलात परत आलो तेव्हा खायला भरपूर खाऊ तयार होता. मी सगळ्यावर ताव मारला आणि पुयनं (पुर्ण) खाऊ संपवला. मग थोड्या वेळाने रूमवर जाऊन आईच्या कुशीत झोपले.


शिक्रा

दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा आम्ही जिप्सीत बसलो होतो. "आपल्याला लांब जायचंय हं, तिकडे अजून बिबटे आहेत." बाबा म्हणाला. मला खूप खूप थंडी वाजत होती. मी जिप्सीत कधी झोपले ते कळलंच नाही. आईनं हळूच हाक मारून मला ऊठवलं तेव्हा बाकी सगळे दुर्बिण नाहीतर कॅमेरात डोके घालून बिबट्या शोधत होते. तेव्हढ्यात लांबवर काहीतरी हलताना दिसायला लागलं. आई, बाबा आणि सगळ्या काकांचे चेहरे एकदम बदलले.
बिबट्याची तीन छोटी छोटी पिल्ल जोरात नाचायला लागली. त्यांच्या आईच्या अंगावरून इकडे तिकडे उड्या मारू लागली, आईची शेपटी ओढू लागली. त्यांची आई जराशी चिडलेली होती. दुर्बिण डोळ्याला लावल्यावर मीही त्यांच्याबरोबर पकडापकडी खेळू लागले, लपाछपी खेळू लागले. ती झाडावर चढत होती, खाली पडत होती आणि एकमेकाशी भांडतही होती. छोटेसे हिरवे डोळे, जाडे पाय, काळ्या कानांवर पांढरे ठिपके असलेली ती पिवळी येल्लो पिल्लं मला घरी न्यायची होती. बिबट्याची पिल्लं बघून सगळे खूष होते. हॉटेलवर परत जाताना सगळे प्रचंड बडबड करत होते. कोणीच यापुर्वी बिबट्याची पिल्लं बघितली नव्हती.


 या पिल्लांबरोबर दुर्बिणीतून मीही खेळले

"चला ही चौथी आणि शेवटची सफारी" बाबा म्हणाला. पुन्हा एकदा आम्ही जिप्सीमधे बसलो. दुपारची वेळ होती. थंडी फार नव्हती. जिप्सी सुरू झाली आणि आम्ही परत मातीच्या रस्त्यांवर फिरू लागलो. एका मोठ्या दगडावर बसून बिबट्यांची वाट बघू लागलो. बराच वेळ थांबल्यामुळे मला भूक लागली पण बिबट्या काही आला नाही. मी रडायला लागणार एव्हढ्यात ड्रायव्हर काका खाली उतरला. त्या काटेरी झाडांजवळ गेला आणि त्यावरची ४-५ छोटी लाल बोरं माझ्या हातात ठेवली. आईने आतली बी काढून मला खायला दिली. बोरं मस्त आंबट गोड होती. आजूबाजुला फक्त बोरांचीच झाडं होती. मग काय, बाबा आणि सगळे काका उतरले आणि झाडावरची बोरं चरु लागले. बिबट्याचा काही पत्ता नव्हता. सुर्य त्याच्या घरी जाऊ लागला आणि जाता जाता बाबाला एक मस्त फोटो देऊन गेला. सुर्यबाप्पा गेल्यावर चांदोबा एकदम छान दिसायला लागला. चांदोबा हा माझा सगळ्यात आवडता मित्र आहे. त्याला बघितलं की मी रडायची थांबते. भिंतीवरचा पंखा हा माझा सगळ्यात पहिला मित्र. त्यानंतर कॅलेंडर आणि नंतर चांदोबा. बाबा मला चांदोबाच्या बागेतला ससा आणून देणारे माहितेय का?माझे जुने मित्र

हळूहळू अंधार वाढत होता. तेव्हढ्यात ड्रायव्हर काकांचा फोन वाजला. "पहिल्या सफारीत दिसलेले बिबटे पुन्हा त्याच डोंगरावर दिसत आहे" बाबा म्हणाला. मग पुन्हा आम्ही 'त्या' डोंगराखाली गेलो. रात्र झाली होती. काहीही दिसत नव्हते म्हणून ड्रायव्हर काकांनी खूप मोठी बॅटरी लावली. बॅटरीच्या लाईटमध्ये सगळे दिसत होते पण बिबट्या काही दिसत नव्हता. आम्ही परत हॉटेलवर जायला निघालो. सहस्र्बुध्धे काका ती मोठी बॅटरी पकडून बिबट्या शोधत होता. "एकंदरी ट्रीप मस्त झाली" बाबा म्हणत एक होता पण चेहरा दुसरं सांगत होता. बिबटे सगळ्यांना दिसले होते, पण ते खूप लांबून. "बघायला मिळाले ना, अजून काय पाहिजे?" आई म्हणाली. बाबा नुसतं "हं" म्हणाला आणि गप्प झाला. "रुको रुको" सहस्र्बुध्धे काका अचानक ओरडला. "डाव्या बाजूला बिबट्या आहे". डोंगरावरचा बिबट्या खाली ऊतरला होता. ड्रायव्हरकाकाने जिप्सी मागे घेतली. आई, बाबा आणि सगळे काका डोळे मोठे मोठे करून लाईटच्या दिशेने बघू लागले. लगेचच आम्हाला तो बिबट्या दिसला. पुन्हा एकदा तो लांबच होता पण डोंगराखालच्या शेतात होता.
दोनच मिनिटांत आमची जिप्सी शेतातून जाऊ लागली. मिट्ट काळोख होता. फक्त त्या बॅटरीचाच दिवा होता. हळूहळू आम्ही बिबट्या जवळ जाऊ लागलो. तेव्हढ्यात बाबाला अजून एक बिबट्या दिसला. त्यानंतर मोनूकाकाला तिसरा बिबट्याही दिसला. त्या मिट्ट काळोखात ते तीन बिबटे जिप्सीच्या तीन बाजूंना होते. आम्ही समोर असलेल्या बिबट्याच्या मागे जाऊ लागलो. पण त्याला लपाछपी खेळायची होती. तो अचानक गायब झाला. आम्ही सगळेच त्याला शोधू लागलो. आजूबाजूला पुयनं (पुर्ण) रात्र. मला भीती वाटायला लागली. तिघे बिबटे आसपास होते पण आम्हाला एकही दिसत नव्हता. अचानक "थांबव थांबव थांबव थांबव हा बघ हा बघ". पराग काका 'हळू आवाजात' ओरडला. बाबा "पिछे पिछे पिछे" असं काहीतरी किंचाळला. जिप्सी थोडी मागे झाली आणि काकाने बॅटरी मारली. बघते तर काय जिप्सीच्या बाजुलाच एक बिबट्या शांतपणे बसला होता. अगदी जवळ, अगदी बाजुला! बिबट्या एकदम थाटात होता. "हाच इथला खरा ठाकूर आहे" बाबा म्हणाला.


खरा ठाकूर

माऊपेक्षा बिबट्या खूपच मोठ्ठा होता. त्याच्या अंगावर भरपूर काळ्या ठिपक्यांचे मऊ मऊ पांघरूण होते. त्यामुळे त्याला थंडी वाजत नव्हती. त्याचा चेहरा एकदम छान होता. सरळसोट नाकाने तो सारखा वास घेत होता. त्याच्या भरपूर पांढर्‍या मिशा मस्त दिसत होत्या. तो त्याचे कान एकसारखे मागे पुढे हलवत होता.सकाळच्या पिल्लांसारखाच याच्या काळ्या कानाच्या मागे एकंच मोठा पांढरा ठिपका एकदम ऊठून दिसत होता. आमचा प्रत्येक आवाज तो ऐकत होता. अगदी कॅमेराचा आवाजसुद्धा. त्याचे पाय एकदम मऊ मऊ गुबगुबीत होते. तो कसलातरी विचार करत असावा. मधेच ऊजवी डावीकडे बघत होता. त्याला भूक लागली नसावी. तो काही बोलत नव्हता. वाघोबासारखा आवाजही करत नव्हता. त्याचे डोळे बाबासारखे होते. मी घरी छोट्या बॅटरीशी खेळते तेव्हा आई मला ओरडते "डोळ्यावर बॅटरी नको मारूस" म्हणून, पण हा ड्रायव्हर काका बिबट्याच्या डोळ्यावरच बॅटरी मारत होता. त्यामुळे त्याला त्रास होत होता आणि एकसारखे डोळे बंद करत होता. मी ड्रायवर काकाला ओरडले नाही, पण एक काका मात्र त्याला बोलला. मग ड्रायवर काकाने बॅटरीसमोर हात ठेवला.
रात्री गाडीतून रटकागिरीला (रत्नागिरी) जाताना समोरून जाणारी गाडी डोळ्यावर लाईट मारून निघून गेल्यावर जसे वाटते तसे बिबट्याला वाटले. लाईट कमी झाल्यावर डोळ्यावर बॅटरी मारणारा काका त्याला दिसला असावा. एकदम तो खाली वाकला, मान ताणून डोके पुढे आणले. बाबा डोळ्यावर लाईट मारणार्‍या गाड्यांवर रागवल्यावर जसे डोळे करतो तसे करून तो बिबट्या आमच्याकडे बघू लागला. फक्त बाबा रागा-रागाने काहीतरी बोलतो (!!) ते काही तो बोलला नाही. तो अगदी एक ऊडी मारून माझ्या बाजूला येऊन त्या काकाला ओरडणार असं मला वाटलं.


समोरून डोळ्यांवर लाईट मारून गेलेल्या गाडीकडे बघणारा बाबा असाच दिसतो (फोटो - परागकाका)

मला त्याची अजिबात भीती वाटली नाही. पण मग त्याला कसलातरी वास आला आणि तो रागावायचं विसरला. एकदम ऊठून ऊभा राहून समोरच्या गवताच्या काडीचा वास घेऊ लागला. अख्खा बिबट्या मस्तच दिसत होता. अगदी गुबगुबीत. त्याची पाठ पिवळी धम्मक होती, पोटाचा भाग मात्र पांढरा होता. सकाळच्या लहान पिल्लांच्या पायाच्या ठशांसारख्या काळ्या ठिपक्यांची गोधडी सुंदर होती. आम्हाला 'बाय' करून तो निघू लागला तेव्हढ्यात आमचा ड्रायव्हर काका एकदम 'बेंssss बेंssss' करून ओरडू लागला. बिबट्याने फक्त एकदा त्या खोट्या बकरीकडे बघितलं, "मला काय वेडा समजलात की काय?" असं म्हणून शांतपणे, कुठलाही आवाज न करता काळोखात गायब झाला. परत काही तो आम्हाला दिसला नाही!


अंधारातला बिबट्या थरार 

जिप्सीतून परत जाताना आई, बाबा आणि सगळे काका फोटो आणि व्हिडिओ बघत इतके बोलत होते की काही विचारू नका. "तो फक्त दहा-पंधरा फुटांवर होता. काय रुबाबदार प्राणी आहे. व्वा. कडक!" विराजकाका म्हणाला. "तो नव्हे, ती होती ती" परागकाका म्हणाला. "बाय द वे, तुम्हाला लक्षात आहे ना? आपल्या जिप्सीच्या तीन बाजूला तीन बिबटे होते, त्या अंधारात त्यातला फक्त एकच आपल्याला नीट दिसला. बाकी दोघे कुठे होते काय माहीत? आपल्या बाजूलासुद्धा बसले असतील.. काय माहीत?" बाबा नेहमीसारखे डोळे इकडे तिकडे करत बोलला. हे ऐकून आमची मात्र चांगलीच बाघरगुंडी (घाबरगुंडी) ऊडाली!!
झोपायच्या झुकझुकगाडीतून परत जाताना सगळे गाणी म्हणत होते आणि मी, ती हिरवी जिप्सी, मोठा पांढरा महाल, तिथलं छान छान जेवण, पहाटेची थंडी, तो निळा गार समुद्र, त्याबाजूला झोपलेल्या मगरी, डोंगरावरचे कठीण चढ, 'बेंssss बेंssss' करणार्‍या बकर्‍या, बर्‍याच हम्मा, ऊंचच ऊंच ऊंट, जोरात धावणारे हरीण, बिबट्याची ती पिटुकली पिल्लं, त्यांची ती थोडिशी चिडलेली आई आणि अगदी जवळून दिसलेला(ली) ती शांत, सुंदर बिबटी हे सगळं आठवत आठवत कधी झोपले ते कळलंच नाही!


22 comments:

 1. बाया मस्त मस्त मस्तच

  ReplyDelete
  Replies
  1. ओवी बायाच्या नजरेतून दिसलेली बेरा सफर!

   Delete
  2. तुझी लेखणपद्धती..... मस्तच.
   मजा आली वाचून....

   प्रीती

   Delete
 2. उत्कृष्ट लिखाण आणि माहिती ची अचूक बांधणी खुपच
  छान. वटकाघूळ हा शब्द मला खूप आवडला.

  ReplyDelete
 3. Very well written.. felt like i was also part of this Safari.. Keep writing..

  ReplyDelete
 4. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 5. movavi-photo-editor-crack-2 provides a large number of tools that can perform simple tasks like cropping. It provides filters and effects and the more complex ones, such as basic photo retouching. Supports BMP, PNG, GIF, TIFF, JPEG + JPEG 2000, JPEG-LS, JPEG, DPX profile,
  freeprokeys

  ReplyDelete
 6. roguekiller-crack can be just actually really a rather adaptable and vibrant program for discovering and taking away some malware on your machine. It enables one to spot and get rid of all sorts of viruses, for example, most of the hottest dangers.
  new crack

  ReplyDelete