Pages

Monday, April 18, 2011

अमेरिकन पुराण..!

काल भेटलेल्या एका अमेरिकन माणसाने आज मला पुन्हा लिहायला प्रवृत्त केलंय...

काल मी आमच्या घराजवळच्या एका दुकानात गेलो होतो. General सामान घ्यायला. दुकानाचे नाव "CFM"... सामानाचे बिल द्यायला मी Counter पाशी उभा होतो.
माझ्या बाजूला साधारण साठीचे एक गृहस्थ उभे होते. मी माझे पाकीट काढले आणि पैसे देऊ लागलो. त्यांनी माझ्या पाकिटाकडे बघितले आणि म्हणाले "Is that the Buddha?"
मी चकितच झालो... मी म्हणालो "No..."
ते म्हणाले "Ok.. then...are you Hindu? Is this Hindu God? Saraswati?"
मी वेडाच झालो.... म्हणालो... "Yes... I am Hindu... and he is Hindu God, Ganapati..... Sri Ganesh.. Sri Siddhi Vinayak...."!

त्यांचा गणिताच्या तासाला बसल्यासारखा चेहरा बघून मला काय ते कळले...
आता या काकांना "गणपती म्हणजे काय... आणि त्याला सोंड कशी आली?" हे कसे सांगायचे या विचारात मी असताना दुकानाचा मालक म्हणाला.. "Do you know Lord Shiva?" ...
"Oh yes... I do.. I do..".. ते म्हणाले
"Ganapati is his Son...!" ... दुकानाचा मालक...!
"Ohh I see.. !"... ते गृहस्थ..
दुकानाचा मालक नेपाळी आहे. त्या दुकानात एकूण तिघे नेपाळी काम करतात. ते हिंदी बोलतात. मला त्यांची नावं माहित नाहीत पण त्यातला एखादा तरी "बहादूर" असावा.. ! असो..

बरं, त्या गृहस्थाने मला विचारले "Are you from Nepal too?" मी म्हणालो.... "No..I am from India..."
"Where from India?"....गृहस्थ
"Maharashtra..Mumbai.."....मी...(मी रत्नागिरीचा आहे हे सांगून त्यांना पडलेल्या गणितात अजून भागाकार न टाकायचा एक साधा विचार...!)
"Ahh.. Mumbai... I had been there.."....गृहस्थ
"So, how did you like India?"..... मी
"He is a journalist..He had been to India"... नेपाळी बहुदूर..

"साठीचे एक पत्रकार गृहस्थ" असे म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभे राहते? माझ्या डोळ्यासमोर तर एखादा दोरीचा चष्मा लावलेला... मळका झब्बा आणि शबनम लटकवलेला, लोकांच्या मुलाखती घेऊन, उद्या पेपरातले आर्टिकल ५०० शब्दांत कसे संपवायचे याचा विचार करत अर्धे आयुष्य घालवलेला आणि "समाज सुधारणेचा"... "चिंता करितो विश्वाची" म्हणत डोक्यावरचे केस गळलेला एक माणूस दिसला असता...... पण हा American Journalist होता.... पाणी काही वेगळेच होते...

"I like Indian culture and Hindu Gods...I know bit of Gujarathi too.. नमस्ते.. एक दोन तीन चार पाच छे सात... बहोत बढीया.... कैसे हो...."...गृहस्थाने एका दमात त्याची "गुजराती" म्हणून दाखवली...
"This is not Gujarathi....this is Hindi....." .... नेपाळी
"I even have Indian Goddess tattooed here...right here...".....(गुजराथी का हिंदी..माझ्या बापाचे काय जातंय अश्या सुरात ते गृहस्थ म्हणाले...)

"Do you want to see? Lemme show ya.."...
आम्ही काही बोलायच्या आत त्या म्हाताऱ्याने त्याची पॅंट मागून खाली सरकवली....
आम्हा दोघांचा चेहरा मी शब्दात व्यक्त करू शकत नाही..!



चित्रकार मंडळींची माफी मागून..!


त्या म्हाताऱ्याच्या ढुंगणावर देवीसारखा टॅटू होता !! डोळे मिटण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता.
"This is not good...really not good..." ... मी
"No..no....this is for praying..."...म्हातारा दोन्ही हात जोडून म्हणाला..
"Ok..but you should find some other place to Tattoo Hindu Gods..." .... मी.....आता दुसरं काय बोलणार मी याला?
"I like Indian gods... I even go to Ashland Temple many times....Have you been there?".... म्हातारा...
"No...I will visit there some time...".... एव्हढे बोललो...आणि आत्ता आपण जो काही प्रकार बघितला तो डोक्यातून काढून कसा टाकायचा याचा विचार करत आणि "Ashland" च्या मंदिरात जाऊन हा माणूस काय उपद्व्याप करत असेल याचा विचार न करण्याचा विचार करत मी घरी परतलो... !

आपली माणसं, ज्यांना अमेरिकन बनायची खूप इच्छा आहे त्यांना माझा एकच प्रश्न आहे.... "ज्या माणसाला तुम्ही दोन मिनिटापूर्वी भेटला आहात, त्याला तुम्ही तुमचे ढुंगण आणि त्यावर कोरलेली चित्रे एका भरलेल्या दुकानात दाखवू शकाल काय"?..... बघा... जमत असेल तर झालात तुम्ही अमेरिकन...!

१४ डिसेंबर २०१० ला मी या भयंकर वेगळ्या संस्कृतीत पाय ठेवला आणि आपोआपच त्यांची आपल्याशी comparison करू लागलो.
इथले लोक, इथल्या गोष्टी आपल्यापेक्षा फार वेगळ्या आहेत.

गाडीशिवाय इकडे जगणं अशक्य आहे. इथे आपल्यासारखे घराबाहेर पडलं कि दोन ढेंगावर मारवाड्याचे "शिवा सुपर मार्केट" नाही किंवा कुठे चहाची टपरी नाही. मी आल्यापासून फक्त दोन चार माणसं रस्त्यावर चालताना बघितली आहेत...!
इथे प्रत्येक घरात दोन तीन गाड्या असतात. Mercedes, BMW, Audi सारख्या गाड्या इकडे किरकोळीत दिसतात. इथले ट्रक आपल्या टाटा आणि लेल्यान्डांच्या अशोकाच्या ट्रक पेक्षा दुप्पट आहेत...





गाड्या


एका गाडीमध्ये एकच माणूस असतो..! फक्त शनिवार रविवारी या लोकांच्या गाडीत बरोबर कोणीतरी (!) असते.....
बर इथल्या सगळ्या गाड्या left hand drive..... त्यामुळे गाडी उजवीकडून चालवायची.
इथे पेट्रोलचे भाव प्रत्येक दिवशी बदलत असतात आणि इथले डीझेल पेट्रोलपेक्षा महाग आहे...
इथे पेट्रोल Gallons मध्ये आणि अंतर मैलात मोजतात आणि तापमान Fahrenheit मध्ये तर वजन पौंडात.
पेट्रोलला हे लोकं Gas म्हणतात आणि रग्बीसारख्या खेळाला फुटबॉल आणि आपल्या फुटबॉलला Soccer म्हणतात.

इथले रस्ते मस्तच आहेत. सगळे स्टेट्सना जोडणारे रस्ते आपल्या Express Way पेक्षा मोठे आहेत. इथल्या Traffic ची शिस्त जरा फारच छान आहे. एकतर रस्यावर कोणी चालताना दिसत नाही, आणि कोण चालत असेल तर त्याला देवा सारखा मान मिळतो..... त्याला रस्ता क्रॉस करायचा असेल तर सगळ्या गाड्या थांबतात...
म्हणा आपल्याकडे गाडी चालवताना असे करायला लागलो तर १० किमी जायला आदल्या दिवशीच निघावं लागेल...असो..!
गाडी चालवताना इथली तीन महापापे... हॉर्न वाजवणे, डोळ्यावर दिवा मारणे आणि ओव्हरटेक करणे..
तुम्हाला खरं सांगतो मी इथे आल्यापासून गाडीचा हॉर्न ऐकला नाहीये. कोणी कितीही हळू जात असला तरी त्याला कोणी हॉर्न देत नाही आणि ओव्हरटेक करत नाही. म्हणा या लोकांना गाडी चालवायचं बाळकडूच मिळालेलं असतं......

इथल्या टीव्हीवर फक्त Insurance, खाणं आणि गाड्या यांच्याच जाहिराती असतात... इथे खास खाण्यासाठी "Food" नावाचे एक channel आहे..! त्यावर २४ तास काही ना काही खाण्याचे कार्यक्रम चालू असतात... हे लोक या जगात जगणारा कुठलाही प्राणी खाऊ शकतात...

मी ज्या दिवशी इथे पाय ठेवला त्या दिवसापासून बर्फ पडायला लागला. म्हणा नको त्या वेळी नको तिथे जाण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती..!
एकदातर तापमान -२१ डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली पोचले होते. इथे कधीही पाऊस पडतो... temperature खाली गेले की बर्फ पडायला लागतो. गेले चार महिने मी जो बर्फ बघितलाय त्यानंतर मी फ्रीजमध्येसुद्धा कधी बर्फ ठेवीन असे वाटत नाहीये.


बर्फ



Before And After

मी जेव्हा इथे आलो तेव्हा साडेतीन चार वाजताच सूर्य बुडायचा... आता मात्र आठ वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असतो.
इथे DST(Daylight Saving Time) नावाचा एक प्रकार आहे. यामध्ये दुपारी जास्तवेळ सूर्यप्रकाश मिळावा यासाठी उन्हाळ्यात हे लोक घड्याळ १ तास पुढे करतात आणि थंडीत ते एक तास परत मागे करतात.... त्यामुळे घड्याळाची चावी किंवा सेल संपल्याशिवाय त्याला हात लावायचा नाही या माझ्या नियमाला इथे तडा गेला हो.....काय करणार?

गाड्या सोडल्या तर अजून एक गोष्ट, जिच्याशिवाय अमेरिकन जगूच शकत नाहीत ते म्हणजे टिशू पेपर. ते खाण्यापासून धुण्यापर्यंत सगळ्यासाठी तेच वापरतात हे काही वेगळे सांगायला नको...

इथले Etiquettes म्हणजे पुण्याच्या भाषेत "बळंचची बकबक..." म्हणजे उगाचच उठल्या बसल्या "Sorry" किंवा "Thank You" किंवा "I appreciate it.."... (मला खरं "उठल्या बसल्या" म्हणणंही जड जातंय.. आमच्या माखजनच्या भाषेत "ह**ल्या...पा**ल्या" म्हणायचा खूप मोह होतोय... पण काय करणार Etiquettes.....आडवे येतायत ना !! )
इथे चालताना सुद्धा Etiquettes... म्हणजे, आपल्या मागून कोणी चालत येत असेल आणि आपण दाराजवळ असू तर आपण दार उघडायचे आणि त्याला पुढे जायला द्यायचे... कोणी मुलगी असेल तर आपण दार उघडायचे...! मला नाही बुवा आवडत लोकांना उगाचच मदत करायला... :P

इथले लोक Machines चा वापर प्रचंड करतात... प्रत्येक गोष्टीत काहीतरी यंत्र असते.. म्हणजे जेवण झाल्यावर टूथपिक काढायलापण यंत्र... हात पुसायचे टिशूपेपर बाहेर काढण्यासाठी पण यंत्र. हात यंत्राखाली नेला की ते आपोआप बाहेर येतात... फारच झालं ना हे? भांडी घासायला Dishwasher. इथले कपडे धुवायचे मशीन तर जरा फारच आहे.. कपडे ड्रायर मधून बाहेर काढले की तुम्ही ते तसेच घालू शकता !! मी म्हणालो असे मशीन आपल्याकडे का दिसत नाही?? पण नंतर त्या मशीनला कपडे धुवायला लागणारे पाणी बघितल्यावर मला माझ्या आईची आठवण झाली... म्हणजे रत्नागिरीतल्या आमच्या अख्ख्या बिल्डींगला लागणारे पाणी हे मशीन एकटे पिते हे जरका आमच्या मातोश्रीना कळले तर त्या मशीनची होळी व्हायला काही वेळ लागायचा नाही..! आपल्या कामवाल्या बायाच बऱ्या..!
अहो इथे कामवाल्या बायांची पण गम्मत आहे... इथे आमच्या घरी दर सोमवारी घर साफ करायला बाया येतात. त्या येताना पॉश गाड्या घेऊन येतात...!!!
अमेरिका खरंच श्रीमंत आहे...! इकडे केस कापायचे १५-२० डॉलर होतात... ! मी हे जेव्हा बाबांना सांगितले तेव्हा ते म्हणाले "लंकेत सोन्याच्या विटा... केस कापायचेत..? द्या दोन विटा.. !!"

इथल्या इमारती Huge..प्रचंड आहेत....इथले चर्च बघितल्यावर आपली देवळं फारच छोटी वाटतात. तसं बघायला गेलं तर इथल्या सगळ्याच गोष्टी...सुजलेल्या...ढोल्या आहेत.





चर्च




टिपिकल अमेरिकन मध्यमवर्गियाचे घर..



Huge




ईमारती


इथले लोकं माझ्या जवळपास दुप्पट आहेत.... अहो मी कशाला इथली मांजरं कुत्री....एव्हढच कशाला, खारी सुद्धा आपल्या खारींपेक्षा दुप्पट आहेत.
हो....कावळे मात्र आपल्यासारखे आहेत...


टोण्या..





ढोल्या खारी

इथल्या लोकांचा एक साधा फंडा आहे.... "स्वत: काहीही करा.... लोकांना त्रास देऊ नका..." तुम्ही घराबाहेर पडताना काय कपडे घालता... काय करता असल्या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाही... तुम्ही एखादे काम चांगले केलेत तर लगेच त्याला मनापासून दाद देतात... म्हणजे, अगदी हॉटेलमध्येसुद्धा वेटरला लोकं मनापासून टीप देतात...
पण साला इथले लोकं बडबड फार करतात.. म्हणजे कोणी अनोळखी भेटला तरी त्याला उगाच "Hey..How are you?" म्हणून विचारतात..
माझ्यासारख्या माणूसढाण्याला मात्र ही बडबड (तीसुद्धा English मधून) म्हणजे जरा वैतागवाणे आहे..!
अरे, English बद्दल लिहायचे विसरलोच... मी English पिक्चर फार बघितल्यामुळे मला ते जे काही अर्धा-पाऊण तास बडबड करतात त्यातले महत्वाचे दोन मिनिट कसे शोधायचे हे चांगले माहिती आहे... बाकीवेळा "Oh, Yes.." असं म्हणून किंवा उगाचच हसून वेळ मारायची !

इथल्या लोकांच्या लग्नाच्या concepts मात्र भयानक आहेत.. परवा माझ्या ऑफिसमध्ये जेवताना एक फिरंग दुसऱ्याबरोबर बोलत होता... जेवण़खाणाबद्दल बोलून झाल्यावर, त्यांचे लग्न, बायको वगैरे असे विषय सुरु झाले... त्यातला एक म्हणाला "I married to an Indonesian girl..."... त्यावर त्याला दुसरा म्हणाला.. "Are you still married to her?????" ... विचार करा... तुम्ही तुमच्या ऑफिस मधल्या मित्राशी बोलत आहात... त्याने आंतरजातीय( आंतरराष्ट्रीय लग्न असे म्हणतात का हो?) लग्न केलंय आणि त्याला तुम्ही विचारताय..."तुमचं लग्न अजून टिकलंय ???"
पण त्याने "Oh yes.. I am still married to her.." असं म्हटल्यावर मला जरा बरं वाटलं..!

मी ऑफिसला रोज Taxi ने जातो... इथले Taxi वाले एक एक नमुने आहेत...साधारण सगळे Taxi वाले साठ ते सत्तर वर्षांचे आहेत....! Taxi चालवून ते आपली पोटं भरतात...
परवा असाच एकदा मी ऑफिसला जात होतो... साधारण साठ वर्षांचा एक Taxi वाला ती Taxi चालवत होता.. हा माणूस प्रचंड बडबड करतो....म्हणजे मी गाडीत बसल्यापासून ते १५-२० मिनिटांनी ऑफिस ला पोचेपर्यंत...

"Its a nice weather today..." त्यांनी सुरुवात केली..
"Yeah...Its in 60s".....मी (म्हणजे ६० Fahrenheit.. )
"Glad that weather is good...This was a bad winter after many years.. You know what I mean..." इथल्या लोकांना "You know what I mean?" असं म्हणायची फार सवय आहे....
"Yeah.. A lot of snow..."..."मी"
"Still it was not as bad as the one in 1978.....It was about 17 feet of fucking snow.. I was younger that time.." मी तिसऱ्यांदा यांच्याबरोबर Taxi ने जात होतो... आणि दरवेळी ही पहिली ३-४ वाक्य असायचीच... ७८ च्या बर्फाने ते काका अजून थंड पडत होते..!
"I have put on some 4 kgs.." मी आपला विषय बदलायला म्हणालो.
"Aaaa haa.. You like American food...burgers and cheese..." ... काका
"Yeah...I had a lot of junk food in last few months..".... नको त्या वेळी मी नको ते का बोलतो? ज्या अमेरिकन फूडवर त्यांचं आयुष्य गेलं त्याला मी जंक फूड म्हणालो होतो...!
"So..what do you like..? Do you like Indian food..?"..... मी जीभ चावत म्हणालो..
"Indian food...naah its too much spicy and hot..." Taxi वाले काका...
"The only hot and spicy thing I like is woman..!! You know what I mean...?" ... साठ वर्षांचे आजोबा हे म्हणत होते...!
"हा हा हा ... !"....मी आपला उगाचंच...धक्क्यातून सावरंत सावरंत... अहो याच्यापेक्षा जास्त reaction काय देणार न मी?
"I am old now...Its not easy to get women now...!!" काका बॉम्ब वर बॉम्ब टाकत होते..
"Yeah I can understand...!"........ मी आता काहीही बोलू लागलो होतो...
"Are Indian women still shy..? I mean parents decide whom to marry and shit like that..?" ..... "ते"
"Yeah.. It is more or less like that..."....... "आपल्या भारतीय अबला नारीवरपण प्रयत्न करून झालेले दिसतायत यांचे...!" मी..आपलं मनातल्या मनात..
"I don't understand this...you should be in love to marry..you should know that person...!" ..... "ते"
"Yeah..true.." ..... "मी"
"I married only two women...my last marriage lasted for 30 years.." .... हे बोलताना अभिमानाने छाती फुलून आली होती त्यांची...!
"Uh huh.."......"मी"
"And look at my kids...I have 3 daughters and 1 son...".........पुढे येणाऱ्या अजून काही भयानक वाक्यांची ही नांदी होती....
"My second daughter is married two times...Elder one is married 4 times....and she has a baby from each one..."
"Oh my god..." ...."मी बोलणार तर काय बोलणार??"
"Every time she says...'He loves me and so he wants a baby...!' " ..... "व्यथित झालेले ते काका म्हणाले"
"I told her straight...look... I can pay for two marriages max...thats all...rest...you are on your own...!"....... मी फक्त आडवा पडायचा बाकी राहिलो होतो...!
त्या काकांचा सूर अचानक बदलला...
"I did so much for them... but now...I am alone...I am fucking alone...
Nobody calls me... I did so much...worked 24 by 7... Saved every dollar for them....fuckkkk... and this is what I get in return..
This is supposed to be the greatest country in the world...but I don't think so...shit...it sucks...Nobody cares...
Nobody calls me...I live alone.... All of them will gather and come and see me when I am six feet under.."
आजोबांच्या डोळ्यात पाणी आले होते...
"Its 3 Allied drive...here we go...Have a nice day my friend..." माझे ऑफिस आले होते...


काही न बोलताच...एका वेगळ्याच मनस्थितीत मी कॅब मधून बाहेर पडलो... १५ मिनिटात त्या माणसाने साठ वर्षांचे आपले सगळे आयुष्य घडघडा बोलून दाखवले होते... इथली थंडी, बर्फ, खाणं, बायका पोरं, त्यांची लग्नं...एक सुने, भकास म्हातारपण आणि "निदान आपल्या थडग्यालातरी भेट द्यायला सगळे येतील" अशी एक आशा....

अमेरिका अमेरिकेतच राहिली तर खूप चांगलं आहे... माझ्या परतीच्या दिवसाचा Countdown Timer कधीच सुरु झाला आहे...!

21 comments:

  1. 1. Excellent post. I think your best so far... no, sorry, that was the Sinhgarh one!
    2. Very astute observations and perfect language.
    3. I envy the American society for their simultaneous convictions in individual freedom and collective responsibility. We Hindus have a long long way to go in both.
    4, Having said that, I must slso say that I am aware and proud of the strengths of Hindu society. The most important of them all is adaptability.

    ReplyDelete
  2. mastach..America varnan chan jamaley..

    ReplyDelete
  3. U do have a gift.. :-)
    Keep exploring...keep writing...

    ReplyDelete
  4. just too good ... now i understand why u call it as PAATAAL... khupach chan ...

    ReplyDelete
  5. nice one.. nicely narrated …..
    every culture has some good & bad things. its on us to decide what’s good n what’s bad for ourselves

    ReplyDelete
  6. Thanks for reading and commenting..!

    ReplyDelete
  7. साहेब,
    एकदम जबरी वर्णन.

    ReplyDelete
  8. ekdam chhan ....America mast describe zaley..

    ReplyDelete
  9. Are Yaar Ka Vi Once again excellent.I love ur posts.---- Amit V Phatak

    ReplyDelete
  10. Oyye Ranade.... too good :)
    what a beautiful writing....I can feel every single experience that u have put in words...as if its just yesterday :) thanks

    ReplyDelete
  11. Thanks Arti !

    ReplyDelete
  12. Amazing...appropriate shabdabandal jast kautuk! Keep up writing....!

    ReplyDelete
  13. Nice post .... i agree with you for last sentence which you wrote here ...
    अमेरिका अमेरिकेतच राहिली तर खूप चांगलं आहे...

    ReplyDelete
  14. Mast ch re....
    Mala awadala... :)

    ReplyDelete
  15. Ahaa chaan vastusthiti mandlit aapan Americachi..........tithe paisa ahe pan prem, jivhala,sanskaar ajibaat nahi ,ahe to fakta swairachaar .... hey wachun asa watata ki gadya apla Bharat deshach jagat changla ahe :)

    Shailesh Bhuvad

    ReplyDelete
    Replies
    1. Shailesh...

      Comment baddal thank you...!

      By the way, "Mera Bharat Mahan" mhantat te kay ugach navhe..!

      Delete