Pages

Friday, November 20, 2009

हॉस्टेल हॉस्टेल - पहिला मान ढेकणाचा !

पृथ्वीवर जीवनाच्या उत्पत्तीचे सगळे सिद्धांत साफ खोटे आहेत. जीवनाची सुरूवात ही ढेकणांपासूनच झाली याची मला आणि माझ्यासारख्या हॉस्टेलाइट्सना पूर्ण खात्री आहे. ढेकूण आणि झुरळ हे प्राणी पृथ्वीच्या जन्मापासुनच सुखाने नांदत आलेत आणि पुढेही रहातील. अशा या सुखी संसारांमध्ये पाहुणे म्हणून मी आणि माझे पार्टनर, 1st year ला, हॉस्टेलच्या रूमवर रहायला गेलो.



ढेकूण हा प्राणी नक्की कसा दिसतो हेच आम्हाला तेव्हा माहित नव्हतं. पहिला महिनाभर त्यांनी दर्शनही दिलं नाही. रात्री डास मात्र कुठूनतरी येऊन चावत असत. तिथले, डास छोटे असावेत... त्यामुळे सुई बोचल्यासारखे काही वाटत नसे. "इतर रूमवर केवढे ढेकूण आहेत...साल्यांना रूम नीट साफही ठेवता येत नाही... गलिच्छ कुठले" असं म्हणून मित्रांची आम्ही जाम खेचत असू. आमच्या रूमवर ढेकूण नव्हते, ही आमची रूम साफ आणि नीटनेटकी असल्याची पावती होती......एक दिवस रात्री अभ्यास करता करता लाईट चालू ठेऊनच आम्ही धारातिर्थी पडलो. नंतर मध्यरात्री कधितरी मला जाग आली. माझ्या हाताजवळूनच, ऊकडीचे मोदक खाल्लेल्या भटजीसारखं पोट घेऊन, तुरुतुरु चालत जाणारा एक ढेकूण मला दिसला. माझ्या हातालाही खाज सुटली होती. आज एक ढेकूण आला उद्या १०० येतील असा विचार करुन त्या ढेकणाला मी फॉलो करायचं ठरवलं. तुरुतुरु चालणारा "तो", माझ्या गादीखाली गायब झाला. प्रचंड झोप येत होती पण आज पाठलाग करायचाच होता. मी गादिचा एक कोपरा उचलला..... समोरचं दृष्य पाहून माझी बोबडीच वळली. सगळी गादी उचलली आणि माझ्या रक्ताने गळ्यापर्यंत पोट भरलेले, गुंजेसारखे टपोरे, असे हजारो दैत्य पत्ते कुटत बसलेले मला दिसले. खिडक्या बंद ठेऊनही रात्री एवढे डास कसे चावतात या प्रश्नाचा खुलासा मात्र अत्ता झाला होता. गेल्या महिनाभरातल्या त्यांनी शोषलेल्या रक्ताचा मी हिशोब लावू लागलो. शरीर एक-दोन किलोने हलकं झाल्यासारखंही वाटू लागलं. त्यानंतर मात्र काही दिवस, आम्ही आमच्या "गलिच्छ" मित्रांच्या रूमवरच जास्त काळ घालवणे पसंत केले.

या ढेकणांची, चावायची वेगळीच स्टाइल असते. अंधार पडला की हे राक्षस दिवसभराचा रमझानचा ऊपास सोडायला फटीबाहेर पडतात. काही वेळातच ते आपल्या हाता-पायांजवळ प्रकटतात. ते जेव्हा चावायला सुरूवात करतात तेव्हा हाता-पायावर, अलगद कोणी मोरपिस फिरवतय, असं वाटतं. नंतर कोणीतरी प्रेमाने, हळूच असा छोटासा चिमटा काढलाय, असं वाटतं. झोपेत असे चिमटे फार मजेशीर वाटतात हो. नंतर मात्र, पोट फुटेपर्यंत ते लाल बासुंदीवर तुटून पडतात. आपापलं आटपून ते परत घरी जातात. आपल्याला जेव्हा प्रचंड खाज सुटायला लागते तोपर्यंत त्यांची एखादी रमी लागलेली असते.

तर, १५ सप्टेंबर २००२, रात्री २ वाजता, आमच्या ढेकूणशाही विरोधी स्वातंत्र्यसंग्रामाला सुरूवात झाली होती. रेक्टरच्या बंगल्यावर ढेकणांच्या जुलुमाविरोधात केलेले प्रस्ताव, "खटमलो हॉस्टेल छोडो" वगैरे असे नारे, रक्तपेढीत रक्तदान करून केलेली असहकार चळवळ, गादी सोडून फक्त जमीनीवरच झोपण्याचा सत्याग्रह यांसारख्या अहिंसेच्या मार्गांनी काही होत नाही हे पाहिल्यावर नाईलाज म्हणून आम्ही हिंसेचा मार्ग पत्करला. दिसताक्षणी ठार मारायचा प्रस्ताव आमच्या हॉस्टेल महासभेत एकमताने पार झाला.

ढेकूण मारण्याची हॉस्टेल मधल्या प्रत्येक मुलाची वेगळी स्टाईल असते. काही पारंपारिकरित्या त्यांना रॉकेलस्नान घालतात, तर काहीजण नवीन ऊपाय काढतात. "सुन बे...खटमलको शॅम्पू के पानी मे डुबा....३ सेकंद लगते है....बस्स्...और काम तमाम.." असा एका नागपूरच्या सिनियरने मला सल्ला दिला. मी जेव्हा हा प्रयत्न केला तेव्हा मात्र ७ सेकंदं लागली...त्यावर "अबे... हेड अँड शोल्डर use कर....Strong रेहता है...."!! अशी हिंदी लाइन त्याने झाडली. काही सिगरेट पिणारे लायटरने, तर काही श्रद्धाळू देवभक्त त्यांच्याकडल्या उदबत्तीने ढेकूणांना चुरके द्यायचे. काहीजण त्यांचावर जोकर गम टाकून तर काहीजण वितळलेले मेण टाकून त्यांना समाधी द्यायचे. ढेकूण मारण्याची खरी मजा यायची ती त्यांची होळी करताना. त्या असूरांवर, V.T. ला मिळणार्‍या स्वस्त "डिओं"नी, मध्ये मेणबत्ती ठेवून केलेला आगीचा फवारा, दसर्‍याच्या दिवशी रावणाला पेटवल्याचे समाधान द्यायचा. नंतर मात्र एकाने, ढेकणांबरोबर गाद्या, कपडे आणि पुस्तकांचीही होळी केली आणि तो प्रकार बंद झाला.

एवढे सगळे मार्ग वापरुनही त्यांची संख्या उलट वाढतच होती. अंदाजे एकास लाख असे प्रमाण असावे. बाकी, भूतांनाही न घाबरणारे... अंनिस वाले... "ढेकूण रात्री मारले तर त्यांची संख्या दुपटिने वाढते", "एकास मारले तर त्याच्या वासाने अजून शंभर येतात" अशा अफवांवर मात्र पूर्ण विश्वास ठेवत असत. अशाच एकाने अमावास्येला ढेकूण मारल्यामुळे परीक्षेत नापास झाल्याच्या बातम्याही मला ऐकल्याचे आठवते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक चेहर्‍यात जसा फक्त "तिचा"च चेहरा दिसतो तसा टिकलीच्या आकाराच्या आणि गडद रंगाच्या प्रत्येक गोष्टीत आम्हाला फक्त ढेकूणराजच दिसू लागले. अहो आमटीतल्या डाळीची सालही मला ढेकूणच वाटू लागली होती..

आता मात्र फारच झालं होतं. सलग २७ तास झोपण्याचा विक्रम केलेल्या आणि हॉस्टेलच्या टॉयलेटमधेही शांत झोपू शकेल अशा संदीप गड्डेवार नावाच्या प्राण्यालाही स्वतःच्या रूमवर आठवडाभर झोप लागली नव्हती. हॉस्टेलवर १८५७ चा ऊठाव झाला होता. प्रत्येकाकडून बाराशे रूपयाची फी घेऊन एक्सपर्ट पेस्ट कंट्रोलवाल्यांना पाचारण्यात आलं. त्यांनी लगेचच कारवाई सुरू केली. हॉस्टेलचा काना-कोपरा त्यांनी औषधाने धुऊन काढला. आमच्या खोलीतला इंच न इंच त्या ऊग्र औषधाने फवारला गेला. फवारलेल्या खोलीत दोन दिवस न जाण्याची आम्हाला सूचना होती. दोन दिवसांनतर आमच्या ढेकूणमुक्त खोलीत जाण्यासाठी आम्ही आतूर झालो होतो. भीत भीतच आम्ही दार उघडले. गादी पाहिली, खुर्ची पाहिली, चारही कोपरे पाहिले.....एकही ढेकूण दिसला नाही. आमचा आनंद गगनात मावेना...या खुशीतच स्वातंत्र्यातल्या पहिल्या वामकुक्शीसाठी आम्ही आडवे झालो..........आणि दहा मिनिटातच "ते" मोरपीस अगदी अलगदपणे परत आमच्या अंगावरून फिरू लागलं....

आमचे डोळे उघडले होते. आम्हाला छ्ळणारे ते राक्षस नसून त्यांना छळणारे आम्हीच कपटी फिरंग होतो. त्यांच्या राज्यात आम्ही परप्रांतीय होतो. त्यांच्याच घरातून त्यांना काढून टाकायला निघालो होतो. हळू हळू काळ लोटला....आम्हीही हिंदू-मुसलमानांसारखे तणावपूर्ण शांततेत रहायला शिकलो. अधून मधून होणार्‍या दंगली वगळता आमच्या हॉस्टेलमध्ये खेळीमेळीचे वातावरण प्रस्थापित झाले.

ढेकूण हा प्राणी जिथे जातो, तिथे तो तिथलाच होऊन जातो. त्याचं समूळ उच्चाटन ही अशक्य गोष्ट आहे. उद्या जरका, "आपल्या चांद्रयानाला, अपोलो यानातून नील आर्मस्ट्राँगला चिमटे काढत, चंद्रावर गेलेल्या ढेकणांच्या एकशे एकोणतीसाव्या पिढीचा शोध लागला आहे" अशी बातमी ऐकू आली तर मला काही फारसं नवल वाटणार नाही.

12 comments:

  1. Great "tribute" to bedbugs. Was LOL throughout. May these blessed creatures keep you awake night after night so that you continue to write such amazing stuff.

    ReplyDelete
  2. lai bhari saheb...
    Hope u enjy ur stay where ever u go ...
    Good one..

    ReplyDelete
  3. Zakaas… Kaataa kirr…
    You must thank the Hostel for honoring you PhD in bedbugs.. :)

    ReplyDelete
  4. जगात कुठेही झोप येवू शकते आता...
    मिलीटरी ट्रेनिंग म्हणतात याला

    :)

    ReplyDelete
  5. Dhekun ....tase mala kalayache naahit.. :-)
    Lekh mast.. aavadala .. Hostel memories revisited .. pudhache lekh yeundet lavakar.

    ReplyDelete
  6. terrific! mast aahe varnan, hasu avarta avarena. btw, ek upaay rahilay tevdha karoon paha... shalet Krishnashastri Chiplunkarancha dhadaa hota... tyatla upaay:
    kontahi tik 20 sarkha aushadh ek chamcha divsatoon don vela pratyek dheknala pajaycha... 3 divsaat khallas sagle! (kon te vicharoo naka ha!)

    thank you!

    ReplyDelete
  7. lol...
    ekdum mast lihilay. hasun hasun purewaat zali.
    mala watata mumbai chya sagalyach hostels war dhekun asatat. maza bhau suddha agadi asssach hairan hota ani aata to suddha "tanavpurna shantatet" rahayala shikalay :D

    ReplyDelete
  8. I came to know @ this thro one of my frnd...
    Blog is hilarious....Gr8 job..and also true story..I think every hostelite goes thro this bizzarely painful experiences reminding him and ushering him into the real world..i mean blood sucking...Ok no place to be philosophical.

    My personal experience is no different. But I had to suffer more than my roommates who were more bug tolerant than me..And I remember I was more jealous of them than the ones who had girls in their practical batches.. So I had to fight with them single handedly...One of my roommate was so tolerant that he could sleep without any problem with whole city of bugs beneath him..i cud see the bugs crawling all over him during night..But I was so sensitive to them that even a sight of them in my bed was enough to kip me awake...So getting completely rid of them was neccesity and not luxury..and as Necessity is mother of all invention...I had to invent way to kip my bed completely bug free even if other beds in room r full of them...Ok so here is my invention, simple but very effective...

    Our beds were made of iron..fortunately..this formula best works with these and not wooden ones...I noticed that even if every night i painskatigly checked and cleared my bed, they wud easily crawl from the foots of my bed in dark....I tried various techniques like applying the bug resistant chalk to foot but to no avail...So one day during doing my morning routine, I had eureka moment..what if I create a water barrier by keeping each foot of my bed in small steel cup(vati) filled with water...
    And from that night on my every night was bug free...:)
    So it turn out that those hardy little creatures though can boast of lot of achievement, swimming is not there cup of tea( or water).

    ReplyDelete
    Replies
    1. मुस्तफा,

      एव्हढ्या detailed comment बद्दल धन्यवाद...!!

      तुम्हाला झालेल्या त्रासाची चांगलीच कल्पना आहे....!

      ढेकणांपासून सुटकेसाठी प्रत्यकजण काहितरी उपाय शोधतोच..!

      तुमचा उपायही चांगला आहे... पण, हॉस्टेलमध्ये रूमवर सतत येणारे मित्र येऊन पहिले बेडवरच बसतात..! येता येता ह्या दैत्यांनाही बरोबर घेऊन येतात... त्याचे काय??

      आणि हल्लीचे हॉस्टेलचे ढेकूण पोहू किंवा उडूही लागले असतील.. काय सांगावे?

      ढेकणांबरोबर खेळीमेळीने रहाणे हा एकच उपाय आहे असे मला वाटते...!

      - काय वाट्टेल ते

      Delete
  9. hmmm. same here. amchya hostel la pn khup dhekun jhale ahet.mi tr waitagli ahe :-( :-( :-(

    ReplyDelete