Pages

Monday, October 05, 2009

द्राविडी दहशत

मॅच बघतोय हो.... भारत विरूद्ध पाकिस्तान......पाकड्यांनी ३०२ धावा कुटल्यात... अत्ता, द्रविड बॅटिंग करतोय आणि त्यामुळेच मी लिहिण्यास "मजबूर" झालोय...

2nd Inning असल्याने सचिन नेहमीप्रमाणे Pressure खाली आऊट झालाय. त्याला नक्की कसलं Pressure येतं कोण जाणे...लगेच मैदानाबाहेर?? म्हणूनच की काय कुणास ठाऊक, पण सचिनने ५०-५० Overs ची वन डे मॅच २५ च्या चार Innings मधे करावी असं सुचवलं आहे.. जास्त वेळा Pressure हलकं करायला जाता येईल :P



तसं, सचिनला आऊट करणे हे प्रत्येक बॉलरचं स्वप्न असतं आणि सचिन कोणालाही निराश करत नाही.. सचिनला बाद केल्यावर १७ वर्षांचा कोणी "आमेर" इकडे क्रिजवर नाचू लागला आणि तिकडे तो हलकट अक्रम, Commentary Box मध्ये नाचू लागला.
सचिन तू God आहेस आमचा..नाही पचत तुझं हे असं क्रिकेट.. प्रत्येक मॅचमध्ये समोरचाच्या कानाखाली किमान ४-५ खणखणीत चौकार हाणून त्याची लायकी दाखवून द्यावीस अशीच माझ्यासारख्या वेड्या भक्तांची ईच्छा आहे.

सचिन आऊट झाल्यावर तो मेरूपर्वत मैदानात आलाय. होय द्रविड मैदानात "खिळावलाय".. बाजूने गंभीर मात्र छान फलंदाजी करतोय.

द्रविड क्रिकेट का म्हणून खेळतो हाच माझा पहिला मुद्दा आहे.. द्रविडने कुठलाही मैदानी खेळ न खेळता, बुद्धिबळ खेळले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. बुद्धिबळाला लागणारे सगळेच गुण त्याचात आहेत. म्हणजे, जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ तो काढू शकतो आणि जशा Target रन्स साठवतो, तशा सोंगट्याही साठवू शकतो. एखादं प्यादं मारण्यासाठी, तो एखादा चौकार मारण्यासाठी जेवढा वेळ लावतो, तेवढा वेळ लावेल. त्यामुळे द्रविड महासंगणकाबरोबर बुद्धिबळ खेळू लागला तर त्यातून धूर येइल. गॅरी कॅस्परॉव (केवढं कठीण नाव आहे) बरोबर खेळला तर त्या गॅरी ला घेरी येइल... अनातॉली कारपॉव ची बुद्धी करपून जाईल... ..विश्वनाथन आनंद वैतागून आपला राजा त्याला देइल आणि म्हणेल "माझी हिटविकेट...घाल माझ्या राजाचं लोणचं...मी जातो !!" त्यात जर द्रविडला पांढर्‍या सोंगट्या मिळाल्या तर पहिली चाल होइपर्यंत, बुद्धिबळ खेळाच्या अस्तित्वाची लढाईच सुरू होइल. बुद्धीबळात King's Pawn Opening, Queen's Pawn Opening, Indian in Reverse etc. अशा Openings आहेत. द्रविडच्या ओपनिंगचं नाव काय असेल बरं?..... "Dravid's Stalemate Opening !!".....

तो बघा द्रविडचा शॉट...वा वा.. अप्रतीम.... बॉल ३० यार्ड सर्कलच्याही बाहेर गेला नाहिये अजून. परत एक dot ball. बॅटच्या कुठल्या भागाला बॉल लागला तर तो सगळ्यात जवळ जातो यावर द्रविडचा मोठा research आहे.
भारताचा स्कोर २५-१ (५.२).

मला दूरदर्शनवर मॅच बघायला खूप आवडतं. सुशील दोशी, हा युगायुगापासून "समालोचन" करणारा आणि राजेंदर अमरनाथ (Management Quota मधला असावा) नावाचा प्राणी "आंखो देखा हाल" सांगायला हजर आहेत. मी त्यांचा फॅन आहे.

अरे वा...नो बॉल !! Free Hit मिळालीय आणि द्रविड Strike वर नाहिये.. !!
गंभीरचा षटकार !! अरे झक्कास !! असे पुल शॉट मारायला तो कधीच घाबरत नाही..

ओव्हर संपलीय आणि द्रविड परत Strike वर आलाय...... हो...तुम्हाला कुठे घरातली कामं आटपायला जायचं असेल, पान-विडीसाठी पानवाल्याकडे जायचं असेल तर या जाऊन खुशाल.. काही होणार नाहिये अजुन २-३ ओव्हर्स.. षटकाच्या शेवटच्या बॉलला १ रन काढून Strike मिळवणं हे तो शाळेतच शिकलाय.

प्रत्येक ओव्हर संपल्यावर दोघे फलंदाज हवा-पाण्याच्या गोष्टी करण्यासाठी भेटतात.. त्या दोघांपैकी एक जेव्हा द्रविड असतो तेव्हा मात्र मला फार भीती वाटते. हा माणूस समोरच्याला काय सांगत असेल?? म्हणजे आपण, कुठे भटकायला जाताना आपली आजी जशी काळजीनं आपल्याला सांगते तसं ...
"जास्त धावू नको हा.. हात-पाय दुखायला लागतील.. दोनच्या जागी एक रन काढलीस तर आभाळ नाही कोसळणारे...आणि जोरात बॅट पण फिरवू नको...हातातून सुटली तर लागेल कोणाला तरी......देवाला गुळ-खोब्र ठेवणारे मी खेळून झाल्यावर !!"

भारताचा स्कोर ७७-१.. त्यात गंभीरच्या ४५ धावा झाल्यात. द्रविड १९ बॉलमध्ये ५ रन्स...
"इस समय राहुल द्रविड बडे आत्मविश्वास और कुशलताके साथ बॅटिंग कर रहे है गेंदबाजोंको विकेट लेने का कोइ मौका नही दे रहे है " इति राजेंदर.. अरे, मॅचची स्थिती काय? त्या द्रविडचा स्कोर काय? आणि तू बोलतोयस काय??

"वैसे आफ्रिदी बडी नपी-तुली गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे है.. एकदम, विकेट के बीचो-बीच गेंद डाल के टर्न प्राप्त कर रहे है " आफ्रिदीचा हा अख्या मॅचमधला तिसरा बॉल होता.

अरे वा... २ रन्स आणि गंभीरची फिफ्टी !!
"जिस प्रकारसे गंभीर बल्लेबाजी कर रहे है उससे लगता है की भारत ये मॅच बडी आसानीसे जीत लेगा " सुशील दोशी जेव्हा अशी "दूरदर्शी" वाक्य बोलतो तेव्हा १००% काहितरी वाईट होणार असतं...
गंभीरचा अजून एक सुंदर फटका...पहिली धाव जोरात काढून द्रविड "येस येस" करतोय....अरे अरे....."नो नो"???
गंभीर रन आऊट.. !!!!

तुमच्या नावडत्या नातेवाइकाने तुम्हाला अगदी प्रेमाने त्याच्या गावी "ये ये" करून बोलवावं.. सगळं वितुष्ट विसरुन "शेवटी नातेवाइक आहे" म्हणत तुम्ही जाण्यास निघावं आणि अर्ध्या वाटेत आल्यावर तुम्हाला फक्त "नो" म्हणून त्याने परत जायला सांगितले तर कसं वाटेल हो??

गंभीरने पाकड्यांनासुधा एवढ्या शिव्या घातल्या नसतील कधी!! भारत ८९ - २

धोणी आलाय खेळायला मैदानावर..... दोन सवती फुगड्या घालतायत असं वाटतंय अगदी !!

आला तो "खिळा" परत स्ट्राईकवर..... द्रविडची बॅट चक्क जोरात फिरलेय... बॉल अगदी फिल्डरच्या हातात... तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो.. द्रविड पक्का Human Rights वाला आहे. फिल्डरला धावायला लावणं, जोरात थ्रो करायला लावणं हे मानवहिताच्या विरोधात आहे, असं त्याचं मानणं आहे. तुम्हाला माहितेय का, द्रविडचा स्लीप मधल्या कॅचचा विक्रम आहे ते? ... अहो कसा नाही असणार? कधी, बाकी मैदानात बघितलंय का तुम्ही त्याला बॉलमागे धावताना? शेवटी Human Rights चा प्रश्न आहे !!

धोणीपण आऊट झाला.. शून्य धावा... मला फारशी अपेक्षाही नव्हती. भारताचा कॅप्टन झाल्यावर ११ कुटुंबाना पोसायचं असतं ना त्याला ! त्या ओझाखाली दबतो बिचारा ! भारत ९३ - ३..
विराट नावाचा कोणतरी किरकोळ (Minor) क्रिजवर आलाय.. नाही म्हणायला ज्युनियर टीमचा कॅप्टन होता तो..

अगदीच नाही तरी पाकडे मात्र मदत करतायंत हा.. अत्तापर्यंत ४० धावा Extras किंवा फ्री हिट वर मिळालेल्या आहेत.

"राहुल द्रविड का ये बेहतरीन शॉट......बॉल Square of the wicket जिसे कहा जाता है वहासे निकलते हुए.......सिधे फिल्डर के पास.....कोई रन नही यहासे, भारत को अगर जीत दिलानी हो, तो राहुल द्रविड को संयम के साथ बल्लेबाजी करनी होगी..अभीतक, वो ककडी की तरह थंडे दिमागसे खेल रहे है शायद इसिलिये ऊनको "The Wall" कहा जाता है " अरे कोणी थांबवा हे अत्याचार....

तिकडे रवि शास्त्री, "Rahul Dravid is playing a sheet anchor role here" असं म्हणतोय... शीट अँकर हि काय भानगड आहे हे बघण्यासाठी डिक्शनरी उघडली तर त्यात "Spare anchor for use in emergency." असं लिहिलं आहे....द्रविड नावाचा हा Spare नांगर एवढा खोलवर रुतून बसलाय, की आपलं हे जहाज त्या पाकिस्तानी वादळातून कधीच बाहेर पडेल असं वाटत नाही.

तसं, नाही म्हणायला द्रविड कमी बॉल्समध्ये जास्त रन्स पण काढतो... IPL मध्ये ४-५ वेळा केलं तसं त्याने... अहो असतो कधीकधी बॅट्समन Out of Form !!

वैतागून विराट कोहलीने बॉल हवेत उडवलाय.....आऊट... परत एक विकेट.... भारत १२० - ४....
सुरेश रैना आलाय आता. अगदी बिंधास्त खेळला होता तो IPL मध्ये.. पण त्यानंतर काही खेळल्याचं ऐकीवात नाही.....

......दोघेजण भलतेच चिकटलेत हा... रैनाने २-३ षटकार मारून रनरेट पण चांगला केलाय. ९५ बॉलमध्ये १०४ धावा हव्यात.. दरम्यान आपल्या द्रविडने त्याची ८२ वी फिफ्टी पूर्ण केली... ८७ बॉलात.... परत एकदा जिंकू असं दिसतंय....

तो बघा द्रविडचा शॉट...अगदी १००% तंत्रशुद्ध.. "It came right out of coaching manual"... हर्षा भोगल्या म्हणाला... रन मात्र एकच ! राहुल द्रविडसारखी गोंद अजुन फेविकॉलच्या जाहिरातीत कशी नाही आली याचंच मला आश्चर्य वाटतंय !!

या द्रविडाला स्वप्न काय पडत असेल हो? ... "पूर्ण ५० ओव्हर, सगळे तंत्रशुद्ध शॉट खेळून ४९ रन्स बनवतोय (शेवटच्या ओव्हरला धावायची गरज नाही, Strike थोडिच मिळणारे?? :P) किंवा ऊरलेल्या १० लोकांना रनआऊट करतोय, ट्वेंटी-ट्वेंटी सारखे अमानवी प्रकार बंद झालेत आणि टेस्ट मॅचमध्ये गोलंदाज त्याचे पाय पकडतायत आणि म्हणतायत "हे द्रविडा आम्ही तुला शरण आलो...दया कर आमच्यावर, आऊट तरी हो नाहितर रन्स तरी काढ.." आणि तो राक्षसा सारखा "हा हा हा हा" करून हसतोय.. !! (इथे रावणरुपी द्रविडाचे कार्टून नक्की खपले असते पण, "कोरा कागद, रंग, ब्रश, पेन्सिली या गोष्टींना तु (कृपया) कधिही हात लावू नको" असं म्हणणार्‍या माझ्या शाळेतल्या चित्रकलेच्या मास्तरांचा तो केविलवाणा चेहरा मला अजूनही रोखतेय...)

अरेरे.... रैना पण आऊट झाला... LBW... ह्या... काय खरं नाही आता... भारत २०७ - ५....
आपला अढळ, निश्चल, बर्फाच्छादित असा थंडगार हिमालय मात्र, बॅट वर करून उभा आहे.
आता पठाण नावाचा बैल आलाय.. खरोखरच तो बैल आहे.. दांडपट्ट्यासारखी बॅट फिरवतो तो... बॉल लागला तर लागला...म्हंजे, या पठाणची बॅटिंग पाहूनच जर त्या द्रविडने सन्यास घेतला तर...
हिंदी सिनेमातल्या हिरोंनी लाथा झाडाव्यात किंवा त्यापेक्षा अशोक सराफने ब्रेकडान्स करावा, तशा प्रकारे काहिसं मैदानावर नाचून, अत्ताच पठाण गावीसुद्धा परतला.. भारत २११- ६...

आता, हरभजन सिंग नावाचा विदुषक आलाय. काहितरी टिवल्या-बावल्या नेहमीच करत असतो तो. सायमंड नावाच्या चिंपांझीला तो माकड म्हणाला होता म्हणून कांगारू मिडियाने आणि Animal Rights वाल्यांनी त्याचावर काही मॅचवर बंदी आणायला लावली होती.
हा हा म्हणता भारत २३१ - ६....

अरे.. हे काय बघतोय मी?? द्रविड आऊट?? आणि तोसुद्धा रनआऊट?? क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा ही कमाल झाली आहे. हरभजनने यावेळेस द्रविडलाच अर्ध्या वाटेतून घरी पाठवले आहे..
एकशे चौदा बॉलमध्ये त्र्याहात्तर रन्स काढून, सगळ्या बॉलर्सचं रक्त पिऊन, ही गोचीड दुसर्‍या गुराच्या प्रतिक्षेत पॅविलियन मध्ये परतली आहे....
.
.
.
.
.
.
.
.
तुम्ही अजूनही वाचताय? भारत जिंकेल अशी आशा अजूनही आहे तुम्हाला? अहो, केला मी टिव्ही बंद... आमच्या शेजारी होणारी
"हडपसर वॉरियर्स" विरुद्ध "चिपळूणचे डेव्हिल्स" हि ट्वेंटी-ट्वेंटी बघायला जातोय मी..

सुशील दोशी मात्र अजूनही म्हणतोय...... "यहासे भारत को अगर जीत दिलानी हो तो हरभजन सिंगको संयम और आत्मविश्वास....."

बाय द वे, द्रविड पंख्यांची (जर अजूनही शिल्लक असतील तर) आधीच माफी मागतो...तसा मीही फॅन होतो त्याचा कधी एके काळी...

4 comments:

  1. Mast zalay lekh ... yeundet ajun ...
    Sheet Anchor vala ekdam aavadal..

    ReplyDelete
  2. gud....chan aahe re ha blog pan..ata regular lihit ja..tuzi 'Shaili' chan aahe ho.. :P

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete