Pages

Thursday, November 26, 2009

हॉस्टेल हॉस्टेल - दुसरी ती रूम !

हॉस्टेलमध्ये जाऊन रूम न बघणे म्हणजे आग्र्यात जाऊन ताजमहाल न पहाण्यासारखं झालं. रूममध्ये प्रवेश केल्या केल्या दरवळणारा तो न धुतलेल्या सॉक्सचा सुगंध, दाराच्या डाव्या बाजूसच जुन्या काळ्या गोल सॉकेटमध्ये अडकवलेल्या पाणी तापवायच्या "रॉड"च्या तारा, प्रत्येक फेरित "कटर..कुटकुट..कुटकुट.." असा काहितरी आवाज काढणारा पंखा, तुटलेल्या हॅंडलची भली मोठी बादली, त्यात एका प्लॅस्टीकच्या "मग्ग्यात" (तांब्यात) कोंबून भरलेले साबण, G T (Glass Tressing) मारण्यासाठी खिडकीतून वजा झालेला काचेचा तुकडा, आरसा, कंगवा, दाढीचं सामान यांसारख्या गोष्टी ठेवण्यासाठी वापरलेलं प्रत्येक पुस्तक, भिंतीवरची भोकं लपवण्यासाठी लावलेली हिरॉइनची पोस्टर्स, एकाच दोरीवर लटकवलेले कमीत कमी पंचवीस कपडे, उरलेले सगळे कपडे सांभाळणारी तुटकी लाकडी खुर्ची, आजूबाजूच्या रूममधले, नुकतेच मेसमध्ये काय असेल ते ओरपून आलेले, जागा मिळेल तिथे घोरत पडलेले, ४-५ उघडेबंब कुंभकर्ण, कान फुटतील अशा "नॉर्मल" आवाजात लावलेली गाणी आणि या सगळ्यात चष्मा लावून अभ्यासाचं पुस्तक ऊघडून बसलेला त्या रूममधलाच कोणीतरी एक बिचारा, जर तुम्ही कधी पाहिला नसेल तर खरच कधी, कोणा हॉस्टेलला जा.



सकाळचे नऊ म्हणजे हॉस्टेलचा आणीबाणीचा काळ. ऊठणे, दात घासणे, रांग लावणे, विधी ऊरकणे, पाणी जाणे या सगळ्या गोष्टी फारच कमी वेळात होतात. नुकत्याच स्पीड ब्रेकरवरून गेलेल्या भरधाव स्कूटरवर, मागे बसलेल्या बेसावध आणि असहाय माणसाची जशी अवस्था होते तशी काहिशी पंचाईत नुकतंच नळाचं पाणी गेल्यावर आत "बसलेल्या" बेसावध "वारकर्‍याची" होते. त्याच्या हातात काही नसतं, बिचारा फक्त देवाची प्रार्थना करू शकतो.

आपला नंबर लागला की आतमध्ये जाउन टेस्ट मॅच खेळत बसणार्‍याला आमच्या हॉस्टेलमध्ये "कासवछाप" म्हणत. त्याला बाहेरच्या रांगेतला कोणी वेगवेगळ्या आवाजात शिव्या घालत असे किंवा कोणी "तीळा तीळा...दार ऊघड..दार ऊघड, घाई लागलेय दार ऊघड...दार ऊघड" किंवा "खुल जा सिमसिम...ही हा हा हा" वगैरे अशी बोंब मारत असे. रांगेत उभं राहिल्यावर माझा एक मित्र त्याच्या गोड आवाजात..

पाऊले चालती, संडासाची वाट
वाट पाहुनिया, लागली रे वाट
पाऊले चालती....संडासाची वाट........

माझ्यापुढे साली, दोन-तीन खाष्टं
लोटा घेऊनिया, बसला कोण आत
पाऊले चालती....संडासाची वाट.........

काठावरी आली, गाडी माझी फास्ट
ऊघडेल दार आता, वेडी माझी आस
पाऊले चालती....संडासाची वाट........

वगैरे असे अभंग म्हणत असे.... आणि त्यावर रांगेतले, उरलेले समदु:खी..... "दार ऊघड आता....दार ऊघड......दार ऊघड आता....दार ऊघड" चा कोरस देत असत. या सगळ्या गोष्टींमुळे "आत" गेल्यावर मी मात्र "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हा साधा नियम पाळत असे. :)

इंग्रजांच्या साम्राज्यावर जसा कधी सुर्य मावळत नसे, तसा तो आमच्या हॉस्टेलवरही कधी मावळत नसे. प्रत्येक रूमवर सतत कोणी ना कोणी जागे असायचेच. एकदा, आमच्या हॉस्टेलवर एका मोबाईल चोराने धुमाकूळ घातला होता. तो रोज ३-४ मोबाईल लंपास करत असे. बुटकासा असा पन्नाशीचा एक म्हातारा रोज दुपारी कोणत्याही रूमसमोर जाऊन, दार ढकलून आत पहात असे; जर कोणी जागे असेल तर "इथे 'राहुल पाटील' कुठे रहातो? मी त्याचा मामा." असं सांगत असे आणि "माहीत नाही" असं उत्तर ऐकून तिथून पळ काढत असे. जर सगळे लोक झोपलेले असतील तर तो गुपचुप सगळे मोबाईल उचलून बाहेरून कडी लाऊन पसार होत असे. असे त्याने जवळपास ५० मोबाईल चोरले. सगळी मुले जाम वैतागली होती. त्याला पकडायचाच असं ठरवून सगळ्यांनी फिल्डींग लावली. नंतर दोन दिवसांनी आमच्या शेजारच्याच रूमवर तो परत आला. रूमवर (चक्क) सगळे जागे होते आणि शांतही होते. आतून काही आवाज येत नाहिये हे पाहून त्याने दार ढकलले. बुटकासा पन्नाशीचा म्हातारा पाहुन रूमवर नक्की कोण आलयं ते सगळ्यांना लगेच कळलं. "या या...मामा.. बसा..कसे आहात तुम्ही..आणतो हा तुमच्या राहुलला बोलावून" असं एका बलभीमाने दारात जाऊन त्याला सांगितलं. चोर भांबावला... त्याला काही कळेनासे झाले. तो काही बोलायच्या आतच रूममधले लोक आणि आम्ही चार-पाच जण मिळून त्याला पकडले आणि बेदम हाणले. आम्ही हॉस्टेलमध्ये हिरो ठरणार होतो. चोर पकडला गेल्याने बरेच मोबाईल वाचणार होते. या आनंदातच त्याला अजून दोन-तीन फटके दिले. जसा प्रत्येक चोर "मी चोर नाही, मी चोर नाही" असं म्हणतो तसा तोही म्हणत होता पण कोण विचारत होतं त्याला?...................नंतर आम्हाला कळलं की तो "त्या" राहुल पाटीलचा मामा नसून वरच्या मजल्यावरच्या खर्‍या प्रकाश पवाराचा खरा काका होता. आमची पाचावर धारण बसली होती....... त्या काका-पुतण्यांची हात जोडून माफी मागून आम्ही आपापल्या रूमवर जाऊन बसलो. त्या दिवशी मेसमध्ये सगळे लोक आमच्याकडे "हेच ना ते.." अशा विचित्र नजरेने बघत होते. मान खाली घालून अभ्यास करण्याखेरीज काही पर्याय नव्हता दोन-तीन दिवस आमच्याकडे. नंतर काही दिवसांनी मात्र खरा चोर पकडला गेला आणि आम्हाला थोडा दिलासा मिळाला. चोराला मिळणारा मार यावेळेला मात्र आम्ही लांबून बघणेच पसंत केले.........खरं सांगायचं तर अशा "सोशल इव्हेंट्स" मुळेच हॉस्टेलमध्ये एकी टिकून रहाते.

कोणीतरी अफाट बुद्धीमत्तेच्या माणसाने हॉस्टेलमध्ये "बेस्ट रूम ऑफ हॉस्टेल" नावाचा अवॉर्ड द्यावा असा प्रस्ताव आमच्या रेक्टरकडे मांडला. झालं, नोटिसा लागल्या. रूम सजवायला एक आठवडा मुदत दिली गेली होती. बर्‍याच जणांनी रूमची साफसफाईही त्याच दिवशी सुरू केली. आम्ही मात्र हॉस्टेलच्या अलिखीत नियमानुसार पहिले सहा दिवस काही केलं नाही. रूम पहिल्या दिवशी आवरली तर सातव्या दिवशी काय तशीच रहाणार होती? फक्त, काहीतरी केलं पाहिजे हा... अशी जाणीव होती. इनस्पेक्शनचा दिवस जवळ येऊ लागला. लोकांनी काय काय नाही केलं? जमीनीची झाडलोट केली, सगळ्या वस्तू नीट जागच्या जागी ठेवल्या, नवीन खुर्चा आणल्या, काही जणांनी चक्क फॅनही साफ केले. काही जणांनी तर मात्र कहर केला. रूमला रंग फासून घेतला. Orthodox असलेल्या आम्हाला हे सगळं बघून खूप राग येत होता. हॉस्टेलची संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानावर हल्ला होत होता... पण खरं तर त्या रंगील्यांची रूम मात्र छान दिसत होती. शेवटी इन्स्पेक्शनचा दिवस उजाडला होता.... ते दुपारी होणार होते... "टिंबटिंबात बुडबुडे आल्याशिवाय कुठलंही काम होत नाही" यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही झाडलोट सुरू केली होती. चांगलाच व्यायाम झाला होता. इतर जण मात्र "शेवटचा हात" मारत होते. हा हा म्हणता दुपार झाली. रेक्टरांनी रूम इन्स्पेक्शन सुरू केलं होतं, आमच्या मजल्यावर ते पोचलेही होते.. ... "सात-आठशे रूम मधून ते एक "बेस्ट रूम" निवडणार.. झं....काय अर्थ आहे याला?" आमच्या रूमची एकंदर परिस्थिती पहाता माझा रूमी "पाय काढायच्या" उद्देशाने म्हणाला. अगदी मनातलं बोलला होता तो.... रेक्टर जेव्हा आमच्या रूमपाशी आले तेव्हा त्यांना "बेस्ट लॉक ऑफ हॉस्टेल" दाखवून आम्ही हॉस्टेलबाहेरच्या भय्याकडे पाणीपुरी हाणत होतो...

कितीही काही झालं तरी आमच्या या खुल्या(ळ्या) दिलात, त्या खोलीने खोलवर खोली केली होती. (खरं सांगतो हो, "ख" चे शब्द खोदून काढून खपवायला खूपच खपावं लागलं :P).

3 comments: