Pages

Saturday, December 12, 2009

हॉस्टेल हॉस्टेल - आता शेवटची टांग !

शिव्या !! हॉस्टेलचा अविभाज्य घटक. हॉस्टेलमध्ये शिव्या न देणे हे बाहेरच्या जगात अश्लील शिव्या देण्याइतकंच अत्यंत असंस्कृत मानलं जातं. पंजाब, कोल्हापूर, माझं गाव आणि हॉस्टेल इथे भारतातल्या ९५ टक्के शिव्या तयार होतात असं माझं मानणं आहे. (वाटत असल्या तरी, दक्षिणेकडल्या भाषांमध्ये जे काही बोलतात त्याला मी शिव्या मानत नाही).


"साल्या", "मेल्या" किंवा "गाढवा" यांसारख्या साध्या शब्दांना शिव्या म्हणणार्‍यांची मला कीव येते. शिवी ऐकली की कसं समोरच्याला, कानावर पेट काढल्यासारखं वाटलं पाहिजे. शिवी नक्की कशी हवी??? "फ","भ","झ" यांसारख्या भारदस्त महारथींनी शिवीची सुरूवात व्हावी. त्याला "व", "च", "द" यांनी जोड द्यावी आणि शेवट "द","ट","त","ड" यांचा "तडका" द्यावा किंवा जोरात "रररर्" ओढावा. शिवीमध्ये अनुस्वार आला की काही वेगळीच मजा येते. पटत नसेल तर तुम्हाला येणार्‍या सगळ्यात वाईट शिवीत, मधेच एक अनुस्वार टाकुन बघा. मग कळेल. खर तर खूप examples द्याविशी वाटतायत.. पण अता हॉस्टेल बाहेरच्या "सुसंस्कृत" जगात वावरतो ना मी.. :(

आमच्या कॉलेजचं नाव मोठं असल्याने आमच्या हॉस्टेलमध्ये पूर्ण भारतवर्ष वास करत होता. काही NRI सुद्धा होते. त्यामुळे आम्हाला सगळ्या देशी-विदेशी शिव्या एकाच ठिकाणी ऐकायला मिळत असत. अहाहा.. काय त्या पंजाबी शिव्या. काय ती त्यांची शिवी द्यायची स्टाईल.. व्वा... शिव्या द्याव्यात तर पंजाब्यांनीच. पण आपल्याकडल्या भाकरीची चव काही पंजाबी रोटीला नाही. आमच्या शेजारी, मराठी शिव्यांचा "पाणिनी" रहात असे. एका दिवसात साडे तीनशे शिव्या दिल्याशिवाय, त्याला झोपच लागत नसे. याच कारणाने एकदा त्याला रात्रीचे जागरण झालं. त्यामुळे दुसर्‍या दिवशी तो दुपारचा गाढ झोपला होता. तेवढ्यात दारावर कोणीतरी थाप मारली. याने काही दाद दिली नाही. मग दार जोरात वाजू लागले. आता मात्र याचं डोकं सटकलं. त्यानंतर अर्धवट झोपेतच, त्याने दार वाजणार्‍याच्या आई, वडील, भाऊ, बहिण, आजी, आजोबा, काका, मामा, चुलते या सगळ्यांच्या नावांचा उद्धार भूत, भविष्य आणि वर्तमानकाळात, असल्या नसल्या सगळ्या संधी, प्रयोगांसकट केला आणि आपला साडे तीनशेचा कोटा, बॅकलॉग सकट पूर्ण करत, दार उघडलं. हॉस्टेलची पहाणी करायला कधीही न येणार्‍या आमच्या रेक्टरची आठवण, देवजाणे त्याच्या कोणा पितराने काढली होती पण नेमका तोच त्या दरवाजासमोर "आ" करून ऊभा होता. त्यानंतर "तो" महान वक्ता आणि आमचा रेक्टर काहीही न बोलता आपापल्या वाटेला निघून गेले. परत कधी मात्र आमच्या रेक्टरला, हॉस्टेलची "हवाई पहाणी" सुद्धा करायला आल्याचं मला आठवत नाही.

हॉस्टेल म्हटलं की मेस आलीच. जगात कुठेही मिळणार नाही असं जेवण तिथे मिळतं. हरभरा, फरसबी आणि अख्खे टोमॅटो यांची M.F. Hussain च्या मॉडर्न आर्ट सारखी दिसणारी मिक्स भाजी, फरदीन खानच्या अभिनयाहुनही रुक्ष अशी पोळी, पाण्याहूनही पातळ आणि लाल तिखटालाही "इश्श" म्हणायला लावेल अशा लाल भडक रस्स्यात टाकलेले, रबरापेक्षाही चिवट, असे सोयाबीनचे गोळे, खानदेशात जन्मलेला "शेवभाजी" नामक भयानक प्रकार, फक्त पांढरा आहे म्हणून तो भात आणि "फिश्ट"च्या दिवशी मिळणारे, शेंबडासारखे दिसणारे ते कस्टर्ड मधले फ्रुट सॅलाड खाणं, म्हणजे अहोभाग्यच. मेसचा असा महान मेनू ठरवणे, सगळा जमा-खर्च बघणे, "मेश"वाल्यांना पगार देणे यांसारख्या गोष्टी सांभाळण्यासाठी "मेस कमिटी" असते. उत्साहाने फुरफुरलेले, काहीतरी करण्याची इछ्छा असलेले आणि "इतर" खर्च भागवण्यासाठी मार्ग शोधत असलेले असे जबाबदार हॉस्टेलाइट्स, मेस कमिटीचे अध्यक्ष बनतात. मेसमध्ये जेवताना अशा अध्यक्षाच्या बाजूला बसल्यावर एखादा पापड किंवा भजी जास्त मिळते हाच कायतो आमचा फायदा ! जेवण कसंही असलं, तरी मित्रांबरोबर एकत्र जेवायला एक वेगळीच मजा यायची. जेवणावर कमेंट मारत मारत कधी ते जेवण संपायचं ते कळायचही नाही. पण, शेवटी त्या मेसमुळेच आईच्या हातचं जेवण "अमृताहुनही गोड" का असतं ते मात्र कळलं.

हॉस्टेल म्हटल्यावर नाकं मुरडणार्‍या काहिंना हॉस्टेल काय असतं हे कधी कळलेलंच नसतं. आपला मुलगा किंवा मुलगी जेव्हा हॉस्टेलवर रहायला जाते तेव्हा त्यांच वय संस्कार होण्याच नाही, तर ते जपण्याचं असतं. त्यामुळे "हॉस्टेलवर राहून माझा मुलगा बिघडला" असं म्हणणार्‍यांनी केलेले संस्कारच मुळात डळमळीत असतात आणि शिव्या मात्र हॉस्टेलला दिल्या जातात, असं माझं मत आहे.

हॉस्टेलचा ठेवा म्हणजे तिथे रहाणारे विद्यार्थी, तिथे मिळणारे, तुमच्यासाठी जीवही देतील असे मित्र. होय, असतात हॉस्टेलवरची मुलं इरसाल, घालतात भरपूर शिव्या, करतात बरेच उपद्व्याप पण त्यामागे असतो स्वातंत्र्याचा एक वेगळाच आनंद. हॉस्टेल तुम्हाला अभ्यास करायला शिकवतं, बोलायला शिकवतं, तुम्हाला ओळखी करायला शिकवतं, मित्र बनवायला शिकवतं, दुसर्‍यांना मदत करायला शिकवतं, परिस्थितीशी जुळवायला शिकवतं, जे आहे त्यात भागवायला शिकवतं, वेळ पडली तर तुम्हाला मारामारी करायलाही शिकवतं. थोडक्यात, हॉस्टेल तुम्हाला जगायला शिकवतं. मग काय फरक पडतो जर गादीत ढेकूण असले तर? काय फरक पडतो रूम छोटी असली तर? काय फरक पडतो जेवणात मीठ कमी असलं तर? आणि काय फरक पडतो खिशात पैसे नसले तर? शेवटी हॉस्टेलच घराची आणि घरच्यांची खरी किंमत काय आहे ते दाखवून देतं.

6 comments:

  1. Blog is as usual gr8....! Pan hostel hostel series madhe ajun 2/3 blogs yayla harkat navti....!

    ReplyDelete
  2. +1 ..
    Lekh mast.. ajun lihita yetil

    ReplyDelete
  3. suravat chan karun pudhe shevat tar ekadam unchivar nela ahe !!!!!!!!! bestcha!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  4. lay bhaaariiii !! ekdum best !

    ReplyDelete
  5. Mast Ahe asech pude chalat raha hostelne shikavalelya rastyavar

    Sandesh Phadnis

    ReplyDelete
  6. *****
    gr88888888888...........

    ReplyDelete