Pages

Monday, February 08, 2010

सडाफटिंग निशाचरांची रत्नागिरी स्वारी

"बरेच दिवस झाले..साला आपण काही केलं नाही..." रानडे परत पेटले होते... "बाईक घेऊन घरी जायचं??" गोगट्यांनी पिल्लू सोडलं....
"Great, how about night riding??"... रानडे म्हणाले.... "अरे आजच्या मॅचचं काय झालं रे..?" गोगट्यांनी विषय बदलला... पण रानड्यांच्या डोक्यात किडा वळवळला होता. लगेच त्यानी आमच्या ग्रुपमधले एकमेव आर्टीस्ट सोहोनी (अमेय), डोक्याने ऊत्तम पण ज्यांच्या सगळ्या गोष्टींत नेहमी गाढव शिंकते असे भिडे (राजेश), आपले भलेमोठे मोने आणि मला फोन फिरवला. आता आर्टीस्ट म्हटल्यावर.. डोक्याने तितकेच सणकी असलेले सोहोनी एका पायावर तयार झाले.. तशा सोहोन्यांनी मुंबई-रत्नागिरी अशा ७-८ बाईक ट्रिपा आधीच मारल्या होत्या. भिडे काय होय म्हणणारच होते...त्याने कधी कुठल्याच गोष्टीला नाही म्हटल्याचे मला आठवत नाही... तर, राहिले द्विधाधारी गोगटे, वजनदार मोने आणि "बिचारा" मी.

मोने नुकतेच प्रेमात पडल्यामुळे त्यांना काही आमच्या या "थेरांमध्ये" इंटरेस्ट नव्हता. एवढंच नाही तर एकावेळी २-३ कणसं आणि त्यावर २ ग्लास ऊसाचा रस सहज "उडवणारा" मोने आता फक्त "डाएट पेप्सी" वर जगत होता. सकाळी चालत फिरायला जाणे (महिन्यातून एकदा), योगाभ्यास (गेल्या सहा महिन्यात एकूण मिळून ५ दिवस...आणि योगाभ्यासानंतर त्या "रामनाथस्वामींकडले मिसळासन" वेगळेच....) हे प्रकार चालू झाले होते... म्हणा डाएटींग, व्यायाम, योगा वगैरे चालू असले, तरी अजून ते १०० किलोचं पोतंच होतं.

"पहाटे निघू... ६ वाजता... ऊगाच जागरण होईल रात्रीच...." मी हळूच एक पुडी सोडली..... "सकाळी मस्त मिसळ पेटवू आणि निघू सात साडेसात पर्यंत.... काय?" इति गोगटे...पण........ "कसले झं पुचाट तुम्ही.. अरे लोकं काय काय Adventures करत असतात.... साधं बाईकवरुन सव्वा तिनेशे किलोमीटर आणि ते सुद्धा मागे बसून तुम्हाला जाता येणार नाही?" माखजन परत सुटलं होतं. साला हा कपिल (रानडे), या वयात डिस्कव्हरी चॅनल बघतो (निर्लज्ज कुठला !!) आणि आमच्या जीवाशी खेळू पहातो... तरी नशीब, साप आणि मगरी पकडायचं अजून काही डोक्यात घुसलं नाहिये. नाहीतर त्या Adventure च छोटं रूप म्हणून आम्हाला पाली आणि सरडे पकडायला जुंपेल. पण शिव्या घालून साल्याने आमच्या स्वाभिमानाला मात्र धक्का दिला होता.. आणि झक मारत "हो" म्हणणं भाग पडलं होतं.

आरंभापुरतेच असले तरी अति-उत्साही, सतत त्यांचं ऑफिस आणि कमीत कमी अजुन एका गोष्टीवर नेहमी विस्काटलेले, सतत डोक्यावर आठ्या असलेले आणि "Keep away" पर्सनॅलिटीचे हे रानडे. यांच्या डोक्यात नेहमी वेगळीच चक्र फिरत असतात. रानड्यांशी तासभर बोललं तर "आतल्या गाठीचा प्राणी" कशाला म्हणावं ते लगेच कळतं. साधेपणा, अभ्यास, हुशारी, एकाग्रता, चित्रकला,संगीत, नाट्य, काव्य या सगळ्या गोष्टींचा फारसा संबंध काही या माणसाशी नाही. शंभर गोष्टींमध्ये हात घालून एकही गोष्ट धड न जमणारे पण त्यातच खुष असलेले असे हे रानडे.



रानडे !

सोहोनी आणि भिडे मुंबईला असतात. त्यांनी मुंबईहून निघायचं, आम्ही पुण्याहून सुटायचं, वाटेत कुठेतरी भेटायचं आणि पुढे एकदम जायचं आणि हे सगळं रात्री करायचं....असा काहितरी भयानक प्लान शिजत होता. घरच्यांसाठी मात्र, मी रात्रीच्या प्रायव्हेट बसने आणि समीर गाड्या बदलत कोल्हापूर मार्गे येणार होता. कपिलने.. "ऑफिसला सुट्टी असली तर येईन उडत उडत.." अशी थाप मारली होती. तो "ऑफिस" हे कारण कुठल्याही ठिकाणी खपवतो. एकदा तर त्याच्या बॉसच्या घरची बोरींग पार्टी चुकवण्यासाठी ... "मेरा ऑफिस है.. नही आ पाऊंगा" असं म्हटलं होतं...पुढं काय झालं ते मात्र तो आम्हाला सांगत नाही.
तिकडे मुंबईतल्या सोहोन्यांना त्याच्या बाबांनी "पुन्हा जरका बाईकवरून आलास तर परत जाताना तू आणि तुझी बाईक एकत्र जाणार नाही" अशी धमकी दिली होती आणि यावेळेला तर प्रवास रात्रीचा होता. भिडेंच्या एकंदरीत इतिहासामुळे त्यांना घरच्यांनी काही बोलणेच सोडून दिले होते. म्हणून शेवटी मुंबईकरांनी फक्त "येतोय" एव्हढंच घरी सांगितलं होतं.

पुण्याहून रत्नागिरीला जायचे चार रस्ते आहेत. एक ताम्हाणी मार्गे, दुसरा भोर मार्गे, तिसरा महाबळेश्वर मार्गे आणि चौथा कुंभार्ली मार्गे. मुंबई-रत्नागिरी (NH17) रस्त्याला ताम्हाणीचा रस्ता लवकर मिळतो. मग काय? झाला प्लान. शुक्रवारी दिवसभर काहितरी टोपल्या टाकून चार वाजताच ऑफिसला टांग द्यायची, ताम्हाणीची वाट पकडायची आणि ८ वाजता महाडला भेटायचं. या खेपेस तयारीही जोरात चालू होती. मला बदल जाणवत होता. गोगट्यांनी गुगल मॅप्सची प्रिंट मारली होती. बाईक्सची डागडुजीही करून झाली होती. रानडे वाटेत खायला फळं आणि सुरा आणणार होते. तिकडे मुंबईकर पाच वाचता ऑफिसला "कलटी" देणार होते. ते महाडला ८ वाजता कसे पोचणार होते देवास ठाऊक.

शेवटी शुक्रवार ऊजाडला. सगळी तयारी करूनच आम्ही ऑफिसात पोचलो. कधी एकदा ४ वाजतायत असं झालं होतं. आम्हा तिघांची ऑफिसेस जवळ जवळ असल्याने दुपारी जेवायला भेटायचे ठरवलं. गोगटे तिथेच मॅप्स घेऊन आले होते. "ताम्हाणीचा रस्ता खराब आहे. दिवसाढवळ्या तिथे लुटमार होते".. गोगटे कुठूनतरी ऐकून आले होते... "पण आपण तर रात्री जाणारोत" (मी आपलं मनात म्हटलं.) . लुटमार वगैरे ऐकल्यावर कपिलचाही चेहरा बदलला होता. थोडक्यात काय तर आमच्या प्लानची वाट लागायला सुरूवात झाली होती. "आपण पहाटे निघुया काय?" इति गोगटे..आता मात्र.. आम्ही बस पकडून रत्नागिरीला जाणार अशी चिन्हं दिसू लागली. "पण नको.. एव्हढी तयारी केलेय ती काय ऊगाचच?" परत गोगटेच.......दर पंधरा मिनिटात तो एकदा तरी दोन विरूद्ध वाक्य बोलतो. रस्ता खराब असल्याचे कळल्याने कपिलला त्याच्या बाईकची जास्त काळजी वाटत होती. परत....हो का नाही, रात्री का पहाटे, ताम्हाणी का कुंभार्ली वगैरे झाल्यावर शेवटी "पुण्याच्या बाहेर पडू मग काय ते बघू" यावर आमचा लंचटाईम संपला.

दुपारी चार हे टायमिंग ताम्हाणीचा घाट दिवसा ढवळ्या पार करायच्या उद्देशाने होते. पण आता मार्गाचाच पत्ता नव्हता. तर, चार वाजले होते. रानडे आपली बाईक घेऊन माझ्या ऑफिससमोर आले. ५ मिनिटात गोगटेही पोचले. रानड्यांची १५० सीसी ची अपाचे आणि माझी आपली शंभर सीसी ची जुनी हिरो होंडा. गोगट्यांना "सहज येणार्‍या, पण करायला न आवडणार्‍या" (सामान्या लोकांच्या भाषेत "न जमणार्‍या") असंख्य गोष्टींमधली एक म्हणजे बाईक चालवणे.



बाईक...


शेवटी बाईकला किक मारली. एक मारली, दोन मारल्या.... शेवटी तेराव्या किकला स्टार्ट झाली. इंजिन घरघरू लागले होते. ताम्हाणी (लुटारू) मार्गे जायचे ठरले होते. ट्रफिकमधून स्वारगेटला पोचेपर्यंतच साडेचार वाजले होते. लुटारूंची गोष्ट अजुनही डोक्यात होतीच. शेवटी जे व्हायचे तेच झाले, आम्ही महाबळेश्वर मार्गे जायचे ठरवले.. आमचे अफाट प्लॅन्स फक्त १० किलोमिटरमधेच फाटायला लागले होते. कात्रज घाटात दुपारी साडे चार वाजताही थंडी होती. तिकडे चाकरमान्यांना अजुन मुहुर्त मिळाला नव्हता. कात्रज घाट संपल्यावर चहाला पर्याय नव्हता. चहाच्या त्या ग्लासमध्ये आख्खी बोटं घालून एक पोर्‍या "अमृततुल्य" घेऊन आला. "दादा, कुठं चाललात?" आमची हेलमेटं, ग्लोव्हज आणि पेहराव बघुन त्याची "चहाचौकशी" सुरू झाली. "रत्नागिरी..." आम्ही म्हटलं. "या गाड्या घेऊन..?" त्यानं आश्चर्याने विचारले.. आम्हालाही बरे वाटले.. म्हटलं "व्वा..हायवेवरच्या चहावाल्याला आपण रात्रीचे बाईकवरून जाणारोत याचं आश्चर्य आहे.."... तो पोर्‍या वाईचा होता. आम्ही महाबळेश्वर मार्गे जाणार हे ऐकल्यावर "दादा... नका जाऊ तिकडून. चोर असतात घाटात... कधीकधी भुतं पण धरतात तिथे." झालं.. चोर-लुटारू होतेच.. त्यात भुतंही धरायला आली होती... गोगटे वैतागले.. "काय व्हायचे ते होऊ दे.. आपण महाबळेश्वरवरूनच जायचं...." सिगरेट मारत मारतच गोगटे म्हणाले. रानड्यांनीही दुजोरा दिला.. मी मात्र कधी माझं मत व्यक्त करत नाही. जाता जाता तो पोर्‍या म्हणाला... "तुमची हिरो-होंडा घाट चढेल ना??".......हायवेवरच्या चहावाल्याच्या आश्चर्याचं खरं कारण काय ते अत्ता कळलं होतं.. रागा रागानेच त्याच्याकडे बघत मी बाईकला किक मारली.

हायवेवर ७०-८० च्या स्पीडने आम्ही आरामात जात होतो. रानड्यांना नवीन गाड्या बघायला खूप आवडतं. त्यामुळे ते वाकुन वाकुन गाड्या बघत होते. "कुठली नवीन गाडी आलीय का रे?"... देव जाणे मी का हा प्रश्न विचारला. "अर्रे... तु पाहिली नाहीस????... टेस्टींगसाठी आलेली, रस्त्याच्या कडेला ऊभी होती ती...., TVS ची नवीन रिक्षा????.....२०० cc चं, टू स्ट्रोक इंजिन आहे आणि तेही विथ इलेकट्रीक स्टार्ट.. त्यात LPG पण आहे वाटतं.."..... अता काय म्हणायचं याला..? असते एकेकाची आवड.. दुसरं काय :)... पण तरिही रीक्षा?????

अत्ता वाटेत गोगटे माझ्यामागे बसले होते. "सरळ कुंभार्लीवरून जाऊया काय? उगाच भानगड नको.".... अता मी सुद्धा चिडलो होतो.. किती, म्हणजे किती वेगवेगळं बोलावं एखाद्याने? काहिही न बोलता गाडी चालवणे उत्तम !!

हे गोगटे म्हणजे आमच्या ग्रुपमधले एक अत्यंत द्विधा (आणि दुहेरी बोलून समोरच्या मनातही द्विधा आणणारे) व्यक्तिमत्व. म्हणजे आपल्या डोक्यात द्विधा आहे की नाही यावरही त्याच्या डोक्यात द्विधा असते. तो मनातल्या मुळच्या द्विधेमुळे परदेशात गेल्यावर भारतातलं "सामाजिक जीवन, संस्कृती, लोकं, प्रेम" वगैरेवर कविता करतो आणि भारतात आल्यावर मात्र युरोप किती "कूल" आहे आणि भारत किती गचाळ आहे हे कुणा विडंबनातनं सांगतो. पुस्तकं वाचणे, कविता करणे (सॉरी स्फुरणे) या गोष्टी त्यांना खूप आवडतात. गोगटे डोक्याने मात्र तल्लख.., अगदी २७ गुणिले ३७ चं उत्तरही एका सेकंदात तो देऊ शकेल. या समीरला एकावेळी कमीत कमी दोन मुली आवडत असतात. पण एकाही मुलीला हे जाऊन बोलण्याची हिम्मत मात्र कधी त्याच्यात झाली नाही. लोकांना चिडवणे त्याला मनापासून आवडते. एखाद्या सिच्युएशनला आठवीत शिकलेलं एखादं सुभाषित मारणे आणि लोकांना काहितरी फिल्मी डायलॉग लगाऊन पेटवणे हे त्याचे आवडते धंदे.




गोगटे !


तर, एव्हाना साडे पाच वाजले होते. चाकरमानीपण निघाले होते. मुंबईतून पनवेल पर्यंत येणं म्हणजे अगदी महापाप. पण पुढे मात्र त्यांच्यासाठी सरळ रस्ता होता. इकडे आम्ही पुणे-बंगलोर हायवेवरून बाईक हाकतच होतो. सरळसोट रस्ता असल्याने काही त्रासही होत नव्हता. साधारण १२० किमी वर महाबळेश्वर फाटा आला. समीर काही बोलायच्या आतच आम्ही बाईक आत घातली. आता रस्ता छोटा झाला होता. रस्त्यात कंदील लावलेल्या बैलगाड्याही दिसू लागल्या होत्या. आजुबाजुला छोटी छोटी घरं.. खूप झाडं.. थंड हवा.. व्वा.. खूप छान वाटत होतं. भाकरी की पिझ्झा, टपरीवरचा चहा कि CCD मधली कॉफी.. खूप सोयी असलेला बंदिस्त फ्लॅट की छोटसं मोकळं कौलारू घर, फणसाखालची थंड सावली की ऑफिसातला AC, लंगोटीयार की ऑफिसातले "Professional" मित्र, मल्टीप्लेक्स मधला मुव्ही की ओपन एअर खातू मधलं विनोदी नाटक या गोष्टींवर कायम झगडणारा ते डोकं यावेळी मात्र त्या पोकळ थाटामाटाचा विचारही करत नव्हते.

अंधार पडू लागला होता. बाईकच्या दिव्यासमोर भरपूर पाखरं येऊ लागली. नाका डोळ्यात नुसती घुसत होती. गाडी थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता. गोगट्यांना काय लगेच सिगरेट पेटवावीच लागली. रानड्यांच तोंड भरून तोंड आल्याने गेल्या आठवड्यात तो फक्त मिल्कशेकवर जगत होता. "अरे एक झुरका मार.. तोंडातले फोड पोळून निघतील..." इति गोगटे. नशीब आमच्या ग्रुप मधे कोणी "डॉ" नाहिये... :) सिगरेट आदि विधी झाल्यावर इंजिनं परत धावू लागली. एव्हाना पूर्ण अंधार झाला होता. थंडीही वाजू लागली होती. अजुन सुमारे २०० किमी चा प्रवास बाकी होता आणि त्यातला अर्धा रस्ता अनोळखी होता.

आम्ही वाईला पोचलो. तिकडे सोहोनी-भिडे पनवेलला पोचले होते. पोलादपूरला जिथे शिवाजीचा पुतळा आहे तिथे भेटायचं ठरलं. हा हा म्हणता आम्ही महाबळेश्वरचा घाट चढू लागलो. रस्ता एकदम मस्तच होता. घाट चढून गेल्यावर महाबळेश्वरचं एक वेगळंच फेस्टीव वातावरण सुरू झालं. सगळीकडे झगमगाट, मोठी मोठी हॉटेल्स आणि जोरात वाजणारं मुझिक...एवढ्यात वाटेतच एक चहावाला दिसला. त्या थंडीत मस्त चहा मस्टच होता. तोंड आलेल्या रानड्यांनी आलं घातलेला गरम गरम चहा घेतला आणि त्या आल्यासारख्याच तिखट आणि चहासारख्याच गरम शिव्या परत बाहेर आल्या. चहा मात्र झाक्क होता. "पोलादपूर किती लांब आहे?" आम्ही विचारलं. "जास्त नाही चाळीस किलोमिटर." चहावाला बोलला. जरा हायसं वाटलं. म्हटलं "चाळीस म्हणजे काहिच नाही. फारतर एक तास. आणि त्यात ७-८ किमी चा घाट".. चहा झाल्यावर जाता जाता तो चहावाला म्हणाला, "पोलादपूरपर्यंत पूर्ण चाळीस किलोमीटरचा घाटच आहे... आंबेनळी घाट."... "एव्हढा मोठा घाट?? शक्य आहे का? चहावाल्याला असं काय ठाऊक असणारे.." असा विचार करत ( की स्वत:ची समजूत काढत??) आणि चहावाल्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकत आम्ही तिथून निघालो. चहावाल्याचं म्हणणं खरं असेल तर आम्हाला लुटायला चोर आणि भुतांकडे चाळीस किलोमीटर होते !!

ऊतार सुरू झाला होता. रस्त्यात माणसं, कुत्रं, लाईट, म्हशी, घरं, वहानं यांपैकी कोणीच नव्हतं. रस्त्यात नुसती वळणंच वळण. शरीरातली फाटण्यासाठीच बनलेली गोष्ट फाटू लागली होती. चोर आले तर त्यांना कसं चकवायचं? यु मारून मागे जायचं की सरळ सुसाट पळायचं? अशा गोष्टी सुरू झाल्या. "माझ्या सॅकच्या ऊजव्या कप्प्यात फळांचा सुरा आहे..अगदीच आपला लागला तर....." इति रानडे. तो सुरा फळांसाठी नाही तर त्या घाटातल्या चोरांसाठीच होता आणि त्या सुर्‍याला कंपनी म्हणून ते पेरू आणि सफरचंद...नाही, तरी म्हटलं, हे रानडे एव्हढे कधीपासून बदलले? "फळांचा सुरा.. चोर आला तर खुपसा.. नाहितर पेरू कापून खा". असं काहितरी तो हेलमेटात पुटपुटला...

तर, गेल्या १० मिनिटात कोणीतिही हलणारी गोष्ट आम्हाला दिसली नव्हती, मिट्ट काळोख होता, गां.फा. थंडी होती आणि मनात चोर आणि भूतं होती. जरा पुढे गेल्यावर रस्ता एकदम खराब झाला. एक वळण झाले... आणि समोर रस्त्याच्या बाजूला.. पाण्याची खळखळ ऐकू आली. एक छोटा धबधबा रस्त्यावरूनच वहात होता. सकाळ असती तर तिथे १५ मिनटं फक्त फोटोग्राफी झाली असती. पण अत्ताची गोष्ट वेगळी होती. अशा पाण्याच्या ठिकाणीच भूतांच्या चहाच्या टपर्‍या असतात. टवाळ वेताळ हडळींवर लाईन मारत असतात. आपण फोटो काढून कशाला ऊगाचच त्यांना त्रास द्यायचा या विचाराने ऍक्सिलरेटर आपोआप जोरात पिळला गेला. दोन वळणं पुढं जातोय तोच अजुन एक धबधबा.. आणि एवढ्यात समोर खूप गंजलेली, फटर् फटर्र् असा आवाज करणारी, एक खटारा स्कूटर.....आणि त्यावर बसलेली केस वाढलेली एक पांढर्‍या रंगाची आकृती आली.... तसा आमचा भूतांवर अजिबात विश्वास नाही.. पण अंगावर शहारे काय सांगून येतात?? गोगटे रामरक्षा, रानडे भीमरूपी सारखं काहितरी म्हणत असल्याचा मला भास झाला. ती आकृती जसजशी जवळ येत होती तसतसं माझं लक्ष फक्त तीच्या पायाकडे होते........ नंतर त्या आकृतीचे सुलटे पाय बघून कित्ती कित्ती बरं वाटलयं म्हणून सांगू???

"तो स्कूटरवाला वरती सुखरूप(??) आला म्हणजे खाली काही भीती नसावी"... इति रानडे.. ऊगाच आपलं मनाचं समाधान. आम्ही गाडी हाकतच होतो. आता रस्ता फारच खराब झाला होता. "इथे गाडी बंद पडली तर??" गोगटे ऊवाच.... घाट संपला की तो खरोखर मार खाणार होता. इंजिन मात्र त्याचं न ऐकता धगधगतच होतं. आम्ही बनवलेल्या सॉफ्टवेरसारख्या या गाड्या "बगी" नसतात याचं मला किती कौतुक वाटलंय त्या वेळी...काही विचारू नका !!

अजून दहा-पंधरा मिनिटं उतरल्यावर चार घरं, एक ट्युब आणि एक (बंद का असेना) गाडी दिसली. बर वाटलं.. न थांबताच पुढे गेलो.. घाट काही संपायचं नाव घेत नव्हता. किड्यांची किरकिर फारच वाढली होती. रात्रीचे १२-१ वाजल्या सारखे वाटत होतं. नक्की किती वाजलेले देव जाणे. काळाकुट्ट अंधार, वेडिवाकडी वळणं बास्स... असच एक मोठ्ठ वळण पार केलं आणि समोर जे बघितलं त्यानं हात पायच गळल्यासारखंच झालं. अंगावरचे काटे आता बाभुळीच्या काट्याएवढे झाले होते. १०-१२ हट्टी कट्टी माणसं मशाली घेऊन येत होती. २ सेकंद डोकच बंद झालं, काही सुचेना...गाडी आपोआप पुढे जात होती.. ते आपोआप जवळ येत होते... पुढे काय होणार काही कळत नव्हतं........ काही क्षणातच आम्ही एका बाजुने पुढे गेलो.. त्यांनी आमच्याकडे ढंकुनही पाहिले नाही.. "काळ.... हाच भीतीवरचा एकमेव इलाज आहे !" हे मात्र तेव्हा मला पटलं :P. अजुन दहाच मिनिटात आम्ही घाट ऊतरलो होतो, अजुनही जिवंत होतो आणि परत शेळ्यांचे वाघ झालो होतो. घाट ऊतरल्या ऊतरल्याच पोलादपूर लागते. वस्ती दिसू लागली होती.. आणि दहा मिनिटातच, साडे नऊ वाजता आम्ही शिवाजी पुतळ्यासमोरच्या झाडाखाली बसलो होतो.


पेटता रस्ता..

आता फक्त मुंबईकरांची वाट बघायची होती. ते साधारण तीस किमी लांब होते. सिगरेटच्या धुराच्या रींगा काढत गोगटे बोलू लागले. "मस्त झाला प्रवास अत्तापर्यंत.....पण मुंग्या आल्यात पृष्ठभागाला." त्याचा तो पहिलाच मोठा बाईकप्रवास होता. "म्हणजे खरचं प्रवास चांगला झाला ना?"...परत एक द्विधा.... "मुंग्या येणारच.. पूर्ण वेळ आपण बसून असतो, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही..." नको तिकडे रानड्यांच सायन्स जोरात धावतं.. "तु जरका एकट्याने प्रवास केलास, तर मात्र मुंग्या येत नाहीत हा... म्हंजे, आपल्याला हवे तसे आपण हलू शकतो.. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन......................" अर्ध्या तासाने जेव्हा अमेयची गाडी समोरून येताना दिसली तेव्हा कुठे "ब्लड सर्क्युलेशन" पुराण बंद झाले. शेवटी संकटकाळी मित्रच मदतीला येतात :P



Yeah..Cheers !!

आम्ही सगळे एकत्र होतो, दहा वाजले होते, सपाटून भूक लागली होती आणि समोरच मस्त अंडा बूर्जीची गाडी होती.. याहून आणि काय चांगलं असणार?? आम्ही एकदम गरम गरम, तिखट बूर्जीवर ताव मारत असताना रानड्यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. तोंड आलं होतं ना... :) कितीतरी दिवसांनंतर आम्ही सगळे भेटत होतो. गप्पा रंगल्या होत्या आणि बॅकग्राऊंडला सोहोन्यांनी मस्त शिवकुमारांचा रागेश्री राग लावला होता.

सोहोनी म्हणजे हाडाचा (कि हाडांचा??) कलावंत. (प्रत्येक डायमेन्शनने तो मोनेच्या अर्धा आहे). कलाकार हा नेहमी विक्षिप्तच असतो. म्हंजे तसा तो नियमच आहे. आपले बाकिचे हिरो विक्षिप्त नाहियेत असं नाही, पण हा जरा जास्तच आहे. "जे. जे. खूळ (स्कूल) ऑफ आर्टस्" मध्ये शिकून उरला सुरला सरळपणासुद्धा संपलेला अमेय सोहोनी. (हो, कारण मी अजुन तरी तिथे एकही "माणसातला माणूस" पाहिला नाहिये. सगळं पब्लिक स्वतःच्याच धुंदीत असतं). कला आणि सिगरेटचा वारसा त्याला वरूनच लाभला आहे. आपले रानडे आणि हे सोहोनी यांचं कलेच्या बाबतीत डिस्कशन नेहमी होत असतं. चित्रकला, फोटोग्राफी, नाटक, संगीत या आपल्याला माहित असलेल्या आणि Renaissance, Surrealism, Realism, Neoclassical असल्या नावांच्या काहितरी भयानक "कल्चरल मुव्हमेंट्स" वर त्यांच्या चर्चा रंगतात. अर्थात रानड्यांना त्यातलं किती कळतं हा वादाचा मुद्दा आहे. पण "बसल्यावर" चर्चा मात्र सॉल्लेड रंगतात.

हाडा(डां)चा कलाकार सोहोनी !

गप्पांच्या नादात ११ वाजले होते आणि जवळपास १५० किमी चा प्रवास बाकी होता. इंनिनही आता थंड झाले होते. आम्ही मुंबई-गोवा हायवेवर होतो तरी रस्त्याला अजिबात वहानं नव्हती. पोलादपूर ओलांडलं की लगेच कशेडी घाट लागतो. रस्त्यावर फक्त आमच्या बाईकचा लाईट आणि आवाज होता. अचानक गोगट्यांना आपण काहिच करत नाहियोत असं वाटलं. घाटात बाईक चालवली तर दुसर्‍या दिवशी फुशारक्या मारायला मिळतील म्हणून बाईक चालवायचं त्यानं डोक्यात घेतलं. आवंढा गिळतच कपिलने समीरला बाईक दिली. त्यांनंतर घाटातल्या त्या वळणांवर गोगट्यांनी बर्‍याच "करा-माती" केल्या आणि रानड्यांनी आपली बाईक परत ताब्यात घेतली. घाटात भयानक थंडी होती. ग्लोव्स घालूनही बोटं कडक झाली होती. हायवेची झिंग हळूहळू चढत होती. कशेडी घाटात एक Complete यु टर्न आहे. दुसर्‍या मिनिटाला गाडी रस्त्याच्या कडेला लाऊन आम्ही त्या यु टर्न च्या कठड्यावर सिगरेटी फुकत बसलो होतो.

बुर्जी खायला न मिळल्याने आणि गोगट्यांच्या रायडींग ऍडव्हेंचर्समुळे वैतागलेल्या कपिलनेही शेवटी धुर काढायला सुरूवात केली. केवळ मस्ती म्हणून सोहोन्यांनी त्या बुर्जीवाल्यांकडून संभाजी विडीचे पाकीटही घेतले होते. सिगरेट नंतर विडी आणि त्या विडीवर आवळा सुपारी!! काय वाट्टेल ते चालले होते. पण रात्री १२ वाजता, कशेडी घाटातल्या गां.फा. थंडीत सडाफटींग निशाचरांचे ते धुम्रपान काही फारसे वावगे वाटत नव्हते.

घाटात आता वारा सुटायला लागला होता. राजेश काडीने सिगरेट पेटवायचा प्रयत्न करत होता. सहा काड्या फुकट गेल्यावर, "जर मी चौवीस डिग्रीजमध्ये सिगरेट तोंडात धरली आणि पेटलेली काडी अडुसष्ट डिग्रीज मध्ये हातात पकडून सिगरेटला ३ सेकंद लावली तर ती पेटलीच पाहिजे !" असे उद्गार त्याने काढले. त्याने स्वतःच्या मरणाला आमंत्रण दिले होते. "राजेश, त्यापेक्षा ती पेटती काडी घेऊन, हात एकशे ऐंशी डिग्रीज मागे आणि ४५ डिग्रीज खाली फिरवून ५ सेकंद लाव..... मानवजातीच कल्याण होईल.." इति गोगटे !!

चारशे पानांचं पुस्तक एका रात्रीत संपवणारे आणि तरिही एकही पुस्तक न वाचता बरळणार्‍या कपिलच्या शिव्या ऐकणारे, बुद्धीबळात नंबर वन आणि जबरदस्त ग्रास्पिंग पॉवर असणारे असे हे भिडे (राजेश). मात्र, जेव्हा कधी एकाच्या वर माणसं राजेशच्या बरोबर असतात तेव्हा "सेंटर ऑफ क्रिटीसिझम" हा नेहमी तोच असतो. तो सगळ्या गोष्टींत भाग घेतो. पण प्रत्येकवेळी लोकं त्याची घे घे घेतात. पण हा एक नंबरचा निगरगट्ट प्राणी. कितीही माती खाल्ली तरी याचा, "आम्ही भिडे!!" असं म्हणत झेंडा कायम वरती! पण माझ्यामते, प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक "भिडे" मात्र असावाच. कोणी काहीही बोलले, वाईट वाटले तरी अंगातला निगरगट्टपणा आणि मनातला चांगूलपणा यामुळे भांडण मात्र कधी होत नाही. किंवा झालेच तर नुसत्या शिव्यांवर ऊरकते. मला वाटतं, अशा या कोणा भिड्यामुळेच ग्रुप एकत्र टिकून रहातो!
बाय द वे, राजेश भिडे हा प्राणी काहिही, कसही, कुठेही, कधिही आणि कितीही खाऊ शकतो. लहानपणीच त्याला "वळू" हे नाव पडलय. एकदा भूक लागली असताना या माणसाने मिसळीबरोबर चक्क सोळा पाव चेपले होते.


भिडे - एवढे पारले-जी तो खरच खाऊ शकतो !

यु टर्न वर एक तास भिडेंची यथेच्च घेतल्यावर पुढचा प्रवास सुरू झाला. कपिलला घाटात गाडी चालवायला जाम आवडते. हायवेची झिंग एव्हाना पूर्ण चढली होती. तो सट सट वळणं मारत होता. मी त्याच्या मागेच होतो. गाड्या वार्‍यासारख्या पळत होत्या. घाट कधी संपला कळलंच नाही. अमेय मात्र मागे राहला होता. ५ मिनिटं झाली तरी तो आला नाही. आमची फाटायला सुरूवात झाली.. गाडी परत फिरवणार एवढ्यात अमेय सावकाश सावकाश आमच्याइथे आला. आल्यावर पाच शिव्यांनंतर तो म्हणाला, "तुम्हाला घाटात एक म्हैस दिसली का?".."हो.. रस्त्याच्या कडेला होती एक म्हैस ऊभी...".. इति गोगटे. "होती ना... तीच म्हैस वाटेत आमच्या समोर ऊभी होती....घाटातल्या वळणावर, मिट्ट काळोखात ती काळी कुट्ट म्हैस... कसला ब्रेक मारलाय......कशेडी घाटात आज २ सुपरमॅन ऊडणार होते..."...... आता मात्र आम्ही सावकाश आणि एकत्र जायचं ठरवलं.. पण हायवेवरून रात्री जायचं म्हणजे असं होणारच.....

सावकाश म्हणत म्हणत १०० च्या वेगाने आम्ही जात होतो. रस्ता एकदम सुसाट होता त्याला आम्ही तरी काय करणार... रात्रीचे ३ वाजले होते आणि आम्ही संगमेश्वरजवळ पोचलो होतो. म्हणजे अजून फक्त ५० किमी. "आता काहीही झालं तरी आपण आपल्याच मातीत आहोत." असा एक विचार ऊगाच डोक्यात येऊन गेला. थंडी तर होतीच त्यात प्रचंड धुकं !!....... अचानक थंडी वाढू लागली आणि दुसर्‍या मिनिटाला आम्ही धो धो पावसातून बाईक हाकत होतो. थंडी वगैरे ठीक होती पण पाऊस??? तुरळेतलं धुकं आणि त्यात तो धो धो पाऊस.. झिरो विसिबिलिटी. काहिही दिसत नव्हत. पूर्ण भिजल्यामुळे कुठे थांबूनही काही ऊपयोग नव्हता. चिंब भिजवल्यानंतर पाऊस गायब झाला. ऊरली सुरली सगळी फाटली होती. बस्स अता घरी जायचं होतं.

दिवसभराचं ऑफिस, दुपारचं ऊन,पुण्यातलं ट्रफिक, बदलते प्लॅन्स, महाबळेश्वरची थंडी, आंबेनळीचे चोर-भुतं, रानड्यांचे ब्लड सर्क्युलेशन, भिडेंची अडुसष्ठ डिग्रीतली काडी, कशेडीतली म्हैस, तुरळेतलं धुकं आणि संगमेश्वरचा पाऊस झेलून शेवटी पहाटे साडेचार वाजता आम्ही रत्नागिरीच्या घाणेकर आळीच्या बोळामध्ये ऊभे होतो. फक्त साडे तीनशे किलोमीटर साठी आम्ही साडेबारा तास घेतले होते, पण मिळालेले अनुभव आणि केलेली मजा अजुन कित्येक वर्ष लक्षात राहिल. हा, म्हणा अजुन काही वर्षांनी, हीच सगळी मंडळी "बाईक" च्या जागी "बायको" घालून हाच ब्लॉग वाचतील तेव्हा मात्र फार मजा येईल.

बरं, यांसगळ्यांतला "मी" आणि "माझी जुनी हिरो होंडा" खरी नाहीच हे वेगळं सांगायची काही गरज नाही...बरोबर ना?

17 comments:

  1. zakkas .. maja ali vachatana..

    ReplyDelete
  2. manavjaaticha uddhaar .... ani nantar 10 minute hasun hasun dolyaat paani aale.

    ReplyDelete
    Replies
    1. nemak kay hot he??? 180 degree mhanaje mage... :) :P

      Delete
  3. अशा पाण्याच्या ठिकाणीच भूतांच्या चहाच्या टपर्‍या असतात. टवाळ वेताळ हडळींवर लाईन मारत असतात. लई भारी लिहिलंय.

    बाईक घेऊन घरी जाणे आणि नंतर बायको घेऊन घरी जाणे, तेवढेच थ्रिलर असणार.

    ReplyDelete
  4. baaaaaaap.....todach nahiye mhanje....ek number....have no words!!!

    ReplyDelete
  5. lai bhariiii .. :P mast zalay ha blog.. maza atta kam sodun firayala jayacha mood alay.. :P

    ReplyDelete
  6. tuffaan, lay bhari lihile aahes, mast anubhav, aata lagna zalyaver vatte bachlor life madhe ase kahich ka kele nahi?

    Aniket

    ReplyDelete
  7. Zakkas re! agdi Dolyasamor punha ubha rahila purn Pravaas !!

    ReplyDelete
  8. लई भारी !!!
    राजगड स्वारी ..... रत्नागिरी स्वारी !!!!
    मग ....आता कुठे स्वारी काढणार ?

    ReplyDelete
  9. Khoop sahiii aahe blog.... khara suchta kasa ree tula???? hasoo avarat nhavta... especially tya mhashichya prakarnavar tar aksharshaha pot dukhla hasoon....
    sahiii... ajun kahi lihishil tar forward karat jaa updates.... :-)

    ReplyDelete
  10. Kharach chan ani mast lihile ahes..

    Khup sadhe, soppe ani saral lihilyamule vachtana 1dum mazza ali

    Keep writing...

    ani ho keep "Bhatkanting"

    ReplyDelete
  11. kay lihilays re..ekdum jabardast :)
    hasun hasun purevaat jhali agadi 68 degree..hahahaha

    ReplyDelete
  12. वाट्टेल भाऊ,
    एकदम झकास जमलं बर.
    माबोवर टाकला कि नाही हा लेख ?
    बाकी नाव लपवायची लय सवय बर तुम्हाला!
    चालायचच.

    ReplyDelete
  13. A guy with Navi Bayko is more enthu than one with Juni Bayko..????

    ReplyDelete
  14. one of the good blogs seen in recent time......
    liked both language n presentation....

    yashodhan

    ReplyDelete
  15. dhamaal :)
    mayboliwar nahi takala ka ha blog? Takaa kee..

    ReplyDelete
  16. Lai bhari.....
    Asach aamhihi ekada gelo hoto... pan rastyat ghat nasalyanne... Pha*** nahi yevadach...

    ReplyDelete