Pages

Monday, April 04, 2011

मुंबई टू पाताळ व्हाया पॅरीस !

आणि, पहाटे पाच वाजता मी प्लेनच्या toilet चा दरवाजा ऊघडण्याची खटपट करत होतो. प्रत्येक गोष्ट काही वेगळीच वाटत होती.

ज्या मिनिटाला मी मुंबई विमानतळात गेलो तेव्हापासून सगळ्या विचित्र गोष्टी होणं चालू झालं. माझ्याकडे तिकिटाची ऑफिसातून काढलेली प्रिंट होती. "विमानाचे तिकिट आणि इतके फालतू?" इथपासून माझ्या डोक्याच्या भुंग्याची पहाट झाली. या प्रवासात मी एकटाच होतो... बरोबर कोणी नव्हते... जरा चुकल्यासारखं वाटत होतं. पण काही इलाज नव्हता.



आत गेल्यावर Air France च्या लाईन मध्ये ऊभा राहिलो... पुढचे लोक जसं करत आहेत तसंच आपण करायचं, एवढं मी ठरवलं... हातात तिकिटाचा तो कागद आणि पासपोर्ट. नंतर एक सुंदरी कसलातरी फॉर्म वाटू लागली.. फॉर्म घेतला आणि रांगेतल्या रांगेत त्या ट्रॉलीवर कसरत करत मी तो फॉर्म भरू लागलो. त्या फॉर्मवर एक जागा होती "Emigration Check Required?" साधारण चांगल्या माणसांना हा "नो" असा असतो... आणि मी असं काही महान पातक केलेलं नसल्याने "नो"च धरून चालत होतो... तसाही पासपोर्टशी आपला कधी संबंध येत नाहीच. पण "तो" भुंगा जागा असल्याने एकदा confirm करायला, पासपोर्टवर हा प्रकार कुठे असतो ते मी शोधू लागलो... आणि To my surprise...It was "EMC Required".... मला काही कळेच ना... इतके दिवस मी काय झोपेत होतो?? भुंगा एव्हाना फारच गरगर करू लागला होता... पण आता काही इलाज नव्हता.. म्हटलं मरो.. काय होईल ते होईल.. मी त्या "Check-in counter" पाशी पोहोचलो.

विमानात किती बॅगा घेऊन जाऊ शकतो आणि प्रत्येक बॅगेच वजन किती असू शकतं, हा अजुन एक प्रकार मला बरेच दिवस त्रास देत होता. माझ्या तिकिटावर "Baggage - 2 Pieces" असं लिहिलं होतं. आता विमानात Check-in आणि Carry On. असे दोन प्रकार. माझ्याकडे टोटल "Pieces" तीन. पुन्हा त्रास... "2 Pieces of check-in baggage or both??" Air France च्या साईटवर मला धड काही मिळाले नव्हते... परत म्हटलं मरो... काय होईल ते होईल...

Check-in counter वरच्या दुसर्‍या सुंदरीने मला हाय हॅलो केलं... आणि काहीतरी अगम्य भाषेत बोलू लागली (फ्रेंच असावी).... तेव्हढ्यात तिथल्या माणसाने माझ्या दोनही मोठ्या बॅगा घेतल्या आणि काहीही कटकट न करता त्या फिरत्या पट्ट्यावर टाकल्या... जरा हायसे वाटले.

बरं, मगाचच्या बाईने रांगेत असताना माझ्या Carry On बॅगवर एक सिक्युरीटी टॅग लावला होता... माझ्या धांदलीत तो बराचसा फाटला... पुढे मला त्यावर Security Stamp मारून घ्यायचा होता. एकाचे दोन भुंगे... मी या विचारात असतानाच त्या बाईने कहिही न बोलता विमानाचे तिकिट माझ्या हातात दिले. हे तिकिट मात्र मस्त होते...विमानाचे वाटत होते. त्या बाईने मला Paris Airport war कुठुन कसे जायचे हे सांगितले. म्हटलं व्वा सोप्प आहे... फक्त "सी" वरून "ई" ला जायचे... पण मला विमानात कुठली सीट मिळाली आहे ते काही कळत नव्हतं.. म्हणजे मी ऐकले होते की ते विचारतात कुठली सीट हवी ते... पण त्या बाईने मला विचारलेही नाही.... बसच्या सवयीनुसार विंडो सीट मागायचं मी ठरवलं होतं... पण कसलं काय...? म्हटलं मरो.. जाऊ जिथे असेल तिथे बसून...

तिकिट मिळाल्यावर पुढे काय करायचे हा प्रश्न होताच. तिथे Emigration चे counters होते. माझा नंबर तसा लगेच लागला आणि मी counter वर गेलो. पासपोर्ट्च्या घोळामुळे काय होणार होतं कुणास ठाऊक..

Counter वर एक काकू बसल्या होत्या... "अमेरिकेत कशासाठी चाल्लायस...??" असा चक्क एकेरी मराठीत तिने प्रश्न विचारला... "मुंबई एअरपोर्टवर मराठी...?" मी काय खुष झालोय माहितेय..? पण मला झालेला आनंद पुढच्या प्रश्नाने मावळला..."शिकायला का???"....

तिने असं का विचारावं?? कॉलेजला नुकत्याच अ‍ॅडमिशन घेतलेल्या बावळट पोरासारखा भांबाऊन इकडे तिकडे फिरताना मला पाहिलं की काय हिने....? की अमेरिकेत बरीच पोरं शिकायला जातात म्हणून.... हो तेच कारण असेल.... ऊगाच स्वतःला बावळट का म्हणायचे? मी आपलं आवाजात शक्य तेव्हढी नर्मी आणत "I am going for Business discussions with our clients.." असं पाठ केलेलं English उत्तर दिलं... ती माझ्याकडे बघतच राहिली... पुढे काहीही न बोलता तीने पासपोर्टवर स्टँप मारला... हुश्श... सुटलो बाबा एकदाचा...

बरं, मी सॉफ्टवेर कंपनीत कामाला असल्याने अमेरिकेची एखादी वारी अनिवार्यच होती.... त्यासाठीच मी विमातळावर होतो.

प्लेन रात्री ३ वाजताचं होतं आणि अत्ता फक्त १ वाजला होता. उगाचच मला सगळ्यांची आठवण येत होती.....

मी सिक्युरिटी चेकच्या रांगेत ऊभा राहिलो. आपल्या जागतिक दर्जाच्या चतुर सिक्युरिटी सिस्टिमवर माझा फारच विश्वास आहे.. आणि त्यात माझ्याकडे "विशेष" असे काही नव्हते... तो बॅगेवरचा अर्धा फाटलेला टॅगच काय तो मला त्रास देत होता.
सगळे चेकिंग झाल्यावर आणि तो stamp मारल्यावर मी जरा शांत झालो. पुढे सरळ मी टर्मिनल्स मध्ये पोहोचलो. सगळे फिरंग लोक दिसू लागले.. आपले काळे सावळे भारतीय जास्त जवळचे वाटू लागले.

आता २ तास टाईमपास करायचा होता. मी इकडे तिकडे भटकू लागलो. आतमधे भरपूर गर्दी होती. तिकिटानुसार माझे विमान टर्मिनल २ ला येणार होते, मी आधी तिकडे गेलो. तिथे कुठलीतरी भलतीच विमाने. पुन्हा भुंगा...! पण म्हटलं २ तास वेळ आहे, नंतर लागेल.
आता काय? पुन्हा भटकंती. भटकंतीचा विचार मनात आला आणि तेव्हढ्यातच माझ्यापुढे चक्क मिलिंद गुणाजी ऊभा राहिला... मिलिंद गुणाजी हा माणूस जन्माला आला तेव्हा त्याच्या आईने चुकून त्याला दुपट्याऐवजी जॅकेटमध्येच गुंडाळले आणि इयत्ता दुसरी पासूनच तो दाढी वाढवून फिरतोय यात मला काहीही शंका नाही. असो...

तो मिलिंदा गुणाने आपल्या वाटी गेला आणि मी पुन्हा इकडे तिकडे फिरू लागलो. १० मिनिटं फिरल्यावर मला कंटाळा आला. पाठिवरची बॅग आता जड वाटू लागली. माझ्या विमानाचाही काही पत्ता नव्हता. मी परत टर्मिनल २ ला गेलो. कुठलेतरी भलतेच विमान. शेवटी तिथल्या "माणसाला" विचारले. त्याने मला माझे प्लेन टर्मिनल ७ ला येणार असे सांगितले. मी ७ ला गेलो तर तिथे ते टर्मिनल १५ ला लागणार असे कळले.... काय वैताग आहे? म्हटले यापेक्षा आपली ST परवडली. स्पिकरवर ते सतत काहितरी बरळत तरी असतात. अख्ख्या ST Stand वर एकही कॉम्प्युटर नसतो. दर मिनिटाला एक ST येते किंवा निघते. तरी सगळ्यांना हवी ती बस मिळते. शिका म्हणावं काहितरी लाल डब्ब्याकडून.

शेवटी बराचवेळ काहिही न करता.. नुसते चित्र विचित्र लोक बघत असताना आमचे विमान अवतरले. मोठी रांग होती आणि मी शेवटचा होतो. माझ्या पुढे एक हिप्पी, एका पिंजर्‍यात त्याचं कुत्रं घेऊन ऊभा होता. म्हटलं असो आपल्याला काय.. पिंजर्‍यातच पाय वर करतोय तोपर्यंत ठीक आहे.. !

पंधरा मिनिटातच मी माझ्या सीटवर होतो. Air Hostess तितपतच होत्या.

माझ्या बाजुच्या सीटवर एक काकू होत्या. आपल्यातल्याच होत्या.. जरा बरं वाटलं. तीन सीटवर आम्ही दोघंच. विमानाची दारं बंद झाली.. म्हणजे तिसरा माणूस येणार नव्हता...म्हणजे खिडकी माझीच होती :).... मी खिडकीत गेलो.... विमानाचा पंखा सोडून काही दिसत नव्हत..... साला अशा नशीबापुढे क्या करेगा पांडू...?

विमान हलू लागले... बाजुचा तो भला मोठा पंख आणि त्याची जेट्स अक्षरशः डुलू लागली... म्हटलं आपले Runway आपल्या इतर रस्त्यांसारखे आहेत की या पंख्याचा एखादा स्क्रू ढिला राहिला???? पण नंतर मी पुढचा विचार करायचा नाही असं ठरवलं..... आणि समोरचं "Air France" चं पुस्तक चाळायला सुरूवात केली. पहिलं पान ऊघडलं आणि त्यावर "In case of emergency......." !! .... असो..चालायचंच..

Plane was ready to take off... विमानाचा पायलट French मधे काहीतरी बोलू लागला. दोनच मिनिटात विमानाने जोर घेतला आणि काही क्षणात मी हवेत होतो. विमानात प्रत्येक सीटच्या समोर एक स्क्रीन होता. त्या स्क्रीनवर मुंबई ते पॅरीस distance दाखवले जात होते... ते बरोबर ७००० किमी होते.... आपल्या असे काही दिसले की, "७००० किमी जायचे म्हणजे किती पेट्रोल लागत असेल नाही?", "विमान Average किती देत असेल?" वगैरे असले प्रश्न पडतात.... काय करणार...मी "देशी" आहे ना! (अमेरिकेतले भारतीय... भारतीयांना "देसी" असे म्हणतात... असं बोलण्यामागे ऊपहासच जास्त असतो....भारतीय कसे खुळे आहेत असे हेच लोक, स्वतःला अमेरिकन समजून, दाखवायचा प्रयत्न करत असतात.... आपलं दुर्दैव दुसरे काय?)......

विमानातल्या त्या स्क्रीनवर एका नकाशावर आपले विमान कुठे आहे तेही दाखवले जात होते. काहीच मिनिटात विमान गुजरातच्या पुढे समुद्रात होते.

रात्रीचे चार वाजले होते आणि मला खूप झोप येत होती. काहीच मिनिटातच मी ढगात गेलो.

परत जेव्हा जाग आली तेव्हा ती French Air Hostess माझ्या समोरून जेवणाचे ताट उचलत होती. काही कळतच नव्हते. पहाटे ५ वाजता जेवण? ही कुठली पद्धत? आणि बरं, मला कळलेही नव्हते की तिने माझ्यासमोर कधी ताट आणले.. चायला नेमके उचलताना जाग आली.

आता पहाटे जाग आली म्हणजे पुढच्या गोष्टी आल्याच... साला या विमानामध्ये toilet चा दरवाजा उघडायचा म्हणजेही त्रास असू शकतो हे कोणाला माहिती? त्यात सगल्या गोष्टी नाजूक. म्हणजे आम्ही जरा जोर लावायचो आणि दार हातात यायचे. उगाच बाकीच्यांचे वांदे !! शेवटी बऱ्याच खटपटीनंतर ते दार उघडले आणि मी मोकळा झालो !!

नंतर....झोप काही लागत नव्हती. समोरच्या स्क्रीन वर पिक्चर बघायचा ठरवला. त्यासाठी लागणारे हेडफोन कानाला लावणे म्हणजे अजून एक कटकट. फार मुश्किलीने मी ते कानावर चढवले आणि कुठलातरी पिक्चर बघू लागलो.

परत डोळे उघडले तेव्हा विमान Paris Airport वर उतरत होते. विमान खाली जाऊ लागले. विमानात बसून मला ९ तास झाले होते. पण Paris मध्ये आत्ता कुठे उजाडत होते. मी आपला Eiffel Tower कुठे दिसतो का ते बघत होतो. पण साला तोही कुठे दिसत नव्हता.

शेवटी Landing ची वेळ आली. विमान उतरताना जरा डावीकडे घसरल्यासारखे वाटले. पण शेवटी, काहीही न होता विमान जमिनीवर उतरले....

Paris Airport साधारण रत्नागिरी शहराएव्हढे आहे... पण त्या वेळी एकूण माणसे मधल्या आळी एव्हढीही नसतील!! टर्मिनल "सी" वरून "ई" ला जायचे म्हणजे लक्ष्मी चौकातून माळनाक्यावरची दोन किलोमीटरची चढाई होती.

माझे अमेरिकेला जायचे विमान (Connecting Flight) साडे अकराला होते. म्हणजे साधारण ४ तास अजून घालवायचे होते. करणार काय? मी एका खुर्चीत बसलो. नंतर उठून दुसऱ्या खुर्चीत बसलो... फेऱ्या मारल्या. गाणी ऐकली...तरी घड्याळाचा काटा अर्ध्या तासानेच पुढे सरकला होता. मी इकडे तिकडे फिरत असताना मगाशी विमानात माझ्या शेजारी बसलेल्या काकू मला पुन्हा दिसल्या.

आम्ही हिंदीतून बोलू लागलो. त्या त्यांच्या मुलाला भेटायला Boston ला चालल्या होत्या. म्हणजे परत त्या माझ्याच विमानात असणार होत्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांनी मला कुठला म्हणून विचारले. म्हटले रत्नागिरी... त्या एवढ्या खुश झाल्या...आणि त्यांनी एकदम मराठीतच बोलायला सुरुवात केली. त्या सुधा मराठी होत्या. मुंबईहून ७००० किमी लांब Paris Airport वर मराठी माणसाशी मराठीत गप्पा !! याहून अजून चांगले काय असणार? गप्पा मारता मारता कळले की त्यांच्या मुलाला आत्ताच मुलगा झाला होता. नातवाला सांभाळायला त्या कुठून कुठे प्रवास करत होत्या. जरा वाईट वाटले. पण आपल्याकडे हे काही नवीन नाही.

काहीच वेळात आमचे विमान आले आणि पुन्हा आम्ही आकाशात होतो. यावेळी विमान रिकामे होते. तीनच्या सीटवर मी एकटाच होतो...पण बाजूचा पंख काही नशिबातून गेला नव्हता. पुन्हा एकदा Eiffel Tower शोधण्याचा मी निष्फळ प्रयत्न केला.

हे विमान जरा वेगळे होते. यात प्रत्येक सीटसमोर स्क्रीन नव्हते. इथल्याही Air Hostess तितपतच होत्या. खाणे पिणे मात्र छान होते. जे नेहमी विमानातून उडत असतात त्यांना मात्र Air France फालतू दर्जाचे वाटते. परवा मी असाच एका अशा मित्राशी बोलत होतो.. तो म्हणाला.... "अरे Air France इतके फालतू आहे ना.. मी एकदा आलो त्या प्लेन ने.... आठ तासांच्या प्रवासात त्यांनी फक्त दोनदा खायला आणले... एकदा जेवण आणि एकदा ब्रेकफास्ट !!! " ..... मला माखजनच्या म्हशींची आठवण झाली... कितीही चारा घाला.. यांची पोटे मात्र रिकामीच....असो चालायचेच... :)

पुढे थोड्यावेळाने माझ्या समोरच्या सीट वरची.. साधारण साठएक वर्षाची फिरंग बाई अचानक Air Hostess शी भांडू लागली. या म्हातारीने वाईनच्या तीन-चार बाटल्या आधीच रिचवल्या होत्या आणि तिला एक-दोन अजून मारायच्या होत्या. Air Hostess मात्र पुढचे पराक्रम टाळण्यासाठी तिला दारू देत नव्हती. शेवटी बराच वेळ चांव चांव झाल्यावर म्हातारीने अजून एक बाटली मिळवली...तिने ती चटकन गटकावली आणि "आ" करून तिची ख्रिस्ताचर्ची टाळी लागली.

पुढे फारसे काही न होता विमान Boston पाशी पोहोचले. दुपारचे साडेतीनच वाजले होते, पण अमेरीकेतला सूर्य मान टाकायच्या मार्गावर होता. विमान जसजसे खाली जाऊ लागले तस तसे सगळे शहर दिसू लागले. व्वा काय नजारा होता......सुंदर.........समोर Boston चा किनारा स्पष्ट दिसत होता. एक मोठा दीपस्तंभ मान ताठ करून उभा होता. समुद्र निळाशार होता. पाण्यात बऱ्याच पांढऱ्या होड्या तरंगत होत्या. पांढरे शुभ्र समुद्रपक्षीही दिसत होते. पानं झडलेली झाडं होती. रस्यांवर बऱ्याच गाड्या होत्या... आपल्याकडे असतात तशा इमारती फारश्या नव्हत्या... त्या ऐवजी जवळ जवळ उभी असलेली स्वतंत्र टुमदार घरे.. त्यांच्यासमोर एक छोटेसे अंगण...आणि अंगणात एखादी गाडी.....काय अप्रतिम चित्र होते. माझ्याजागी एखादा चित्रकार असता तर त्याने एका नजरेतच तो नजारा टिपून एक सुंदर चित्र रेखाटले असते.....

विमान खाली उतरले आणि पुन्हा एकदा डोक्यातले भुंगे जागे झाले. दोन आठवड्यापूर्वीच माझ्या कंपनीतल्या एकाला अमेरिकेत एन्ट्री न देता, विमानतळावरून या लोकांनी परत पाठवला होता.....आणि नेमका माझ्या वाट्याला एक कोणतरी काळा अमेरिकन सांड Emigration Officer म्हणून आला होता..... माझे काय होणार होतं देव जाणे...!

पण मोठ्या नशीबाने त्या यमदुताने मला फारसे काही न विचारता माझ्या पाठ केलेल्या उत्तरावर समाधानी होत हसत हसत पाताळाचे दरवाजे उघडले...!

11 comments:

  1. Sahi ahe. Chanach! -Vinit

    ReplyDelete
  2. Waiting for your blog on world cup... -Vinit

    ReplyDelete
  3. Super funny! Write more often..!

    माखजनच्या म्हशीं.....! Hee hee hee!!!

    ReplyDelete
  4. नादखुळा........!!!

    ReplyDelete
  5. Mast lihila aahes....
    Travel chya veli vatta tasa ditto.. and with signature style..
    yeundet ajun..

    ReplyDelete
  6. good one....chitr ek number aahe

    ReplyDelete
  7. Chan......

    एकाचे दोन भुंगे...
    शिका म्हणावं काहितरी लाल डब्ब्याकडून.....
    He as kahi suchatay kas kay????? te pan barobar velevar???

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Suraj...

      Hehe... Try starting your blog... Suchel apoaap...!

      Delete